बाबासाहेबांसारखी चिकित्सक वृत्ती अंगिकारावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:30 AM2018-04-16T00:30:51+5:302018-04-16T00:30:51+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान, संस्कृती, इतिहासातील सूक्ष्म बाबी समजून घेण्यासाठी अनेक भाषा अवगत केल्या होत्या. मराठी त्यांची मातृभाषा होती; पण त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अनन्य साधारण होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वज्ञान, संस्कृती, इतिहासातील सूक्ष्म बाबी समजून घेण्यासाठी अनेक भाषा अवगत केल्या होत्या. मराठी त्यांची मातृभाषा होती; पण त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अनन्य साधारण होते. त्यांनी फ्रेंच राज्यक्रांती, युरोप समजून घेण्यासाठी फ्रेंच, ग्रीक, जर्मन या भाषांचा अभ्यास केला. त्या शिकून घेतल्या. यामुळे ते जगातील सर्वोत्तम ज्ञान आत्मसात करू शकले. बाबासाहेबांपासून प्रेरणा घेत आजच्या तरुणांनी जगाची भाषा आत्मसात करावी, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त पोलीस ग्राऊंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने शनिवारी व्याख्यानाचे आयोजन करण्यता आले होते. यावेळी ते ‘बाबासाहेबांच्या विचारधारेतून मिळणाºया प्रेरणा’ विषयावर व्याख्यान देत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ. पंकज भोयर तर अतिथी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिक मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार विनोद राऊत, आयोजन समितीचे अध्यक्ष प्रमोद राऊत, संयोजक विशाल रामटेके उपस्थित होते.
डॉ. आंबेडकरांनी केलेल्या कामाचे स्वरूप व्यापक आहे. ते काम लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे, यावर भर देताना डॉ. साळुंखे म्हणाले की, बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील १० वर्षे शेतकºयांसाठी खर्ची घातले; पण त्याबद्दल अनेकांना काहीच माहिती नाही. शेतकºयांसाठी त्यांनी अनेक परिषदा घेतल्या. त्यावेळच्या प्रांतिक असेंब्लीवर बाबासाहेबांच्या नेतृत्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. १९३७ मध्ये त्यांनी स्वतंत्र मंजूर पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या विजयी उमेदवाराच्या सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात प्रारंभीपासून फक्त अस्पृश्य समाजाच्या हिताचा विचार करीत काम केले; पण बदलत्या काळाची गरज लक्षात घेत माझ्या कामाची दिशा बदलली आहे. मी सर्व कष्टकरी, मजूर, कामगार, शेतकरी यांच्या हितासाठी काम करायचे ठरविले आहे. यामुळे बाबासाहेबांच्या कुठल्याही कामात संकुचितपणाला वाव नव्हता, हे स्पष्ट होते. तरुणांना जगभर संधी आहे. यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा आदर्श घेत वेगवेगळ्या भाषा अवगत कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकातून प्रमोद राऊत यांनी डॉ. आंबेडकरांच्या जयंती उत्सवाला ‘विचार व प्रबोधनाचा उत्सव’ असे स्वरूप देता आले, याबद्दल समाधान व्यक्त केले. ही परंपरा कायम ठेवू, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी न.प. कर निरीक्षक रवी जगताप, पराग पोटे, कार्यकारी अभियंता अनिल तेलंग, नियोजन अधिकारी टेंभूर्ण, डॉ. अमोल लोहकरे, बाबासाहेब देशमुख, डॉ. पुरुषोत्तम मडावी, हेमंत पावडे यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय वसंत भगत, परवेज खान यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य केले.