‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात अडकला ‘डाॅक्टर’; ब्लॅकमेल करून ३.२५ लाखांना घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 11:33 AM2022-02-18T11:33:31+5:302022-02-18T11:39:53+5:30
सावंगी येथील एका डॉक्टरला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात खेचून ब्लॅकमेल करीत तब्बल ३ लाख २५ हजार ५४० रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वर्धा : सोशल मीडियावर भेटलेली एखादी अनोळखी तरुणी व्हिडिओ कॉल करून तुम्हाला विवस्त्र होण्यास भाग पाडत असेल, तर जरा भानावर या..! कारण भुरळ घालणारी देखणी तरुणी ही दुसरी-तिसरी कुणी नसून, सायबर चोरट्यांच्या सेक्सटॉर्शन टोळीचाच सदस्य असते. असाच धक्कादायक प्रकार पुढे आला असून, सावंगी येथील एका डॉक्टरला ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात खेचून ब्लॅकमेल करीत तब्बल ३ लाख २५ हजार ५४० रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सावंगी येथील महाविद्यालयातील एका डॉक्टरची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीशी ओळख झाली. दोघांत मैत्री झाल्यानंतर डॉक्टर युवकाला तरुणी व्हिडिओ कॉल करू लागली. दरम्यान, तरुणीने डॉक्टर युवकाचा आणि स्वत:चा विवस्त्र व्हिडिओ बनवून ती क्लिप डाॅक्टर युवकाच्या मोबाइलवरील व्हॉट्सॲपवर पाठविली; आणि ती व्हिडिओ क्लिप डीलीट करण्यासाठी पैशाची मागणी केली.
बदनामी होण्याच्या भीतीने डॉक्टर युवकाने फोन पे आणि गुगल पेच्या माध्यमातून अज्ञात तरुणीच्या खात्यावर पहिले ६० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर पुन्हा पैशाची मागणी करून ब्लॅकमेल करू लागली. अखेर डॉक्टर युवकाने पुन्हा २ लाख ६५ हजार ५४० रुपयांची रक्कम पाठविली, असे एकूण ३ लाख २५ हजार ५४० रुपयांनी डॉक्टर युवकास गंडविल्याने त्याने याबाबतची तक्रार सावंगी पोलिसांत दिली. पुढील तपास ठाणेदार धनाजी जळक आणि सायबर सेल करीत आहे.
राजकीय पुढाऱ्यांसह उच्चशिक्षित शिकार
ललनांच्या अदांवर राजकीय क्षेत्रातील एका पक्षातील युवा नेतादेखील सेक्सटॉर्शनचा शिकार झाला आहे. इतकेच नव्हेतर, उच्चशिक्षितांनादेखील ललनांनी आपल्या जाळ्यात ओढून लाखोंचा गंडा घातल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
ही आहेत टोळीची केंद्र
दिल्ली, हैदराबाद, गाझियाबाद, राजस्थान, नोएडा ही ‘सेक्सटॉर्शन’च्या टोळ्यांची प्रमुख केंद्रे असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी फेसबुकवर मैत्री महागात पडू शकते, हे तितकेच खरे.