डॉक्टरांची एन्ट्री तब्बल सव्वा तासांनी
By admin | Published: June 26, 2014 11:26 PM2014-06-26T23:26:06+5:302014-06-26T23:26:06+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने
सरकारी रुग्णालयांचे विदारक वास्तव : रुग्णालयांचा परिसर घाण व दुर्गंधीयुक्त
वर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका मुख्यालयी असलेल्या उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची चांगलीच हेळसांड सुरू असल्याचे विदारक वास्तव गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनमधून उघड झाले. हे रुग्णालये जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी की वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी, असा सहज प्रश्न जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थितीवरुन निर्माण झाला.
सकाळी ८.३० वाजतापासून सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्णांची गर्दी सुरू झालेली होती. रुग्ण आपली प्रकृती दाखविण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षापुढे ताटकळत होते. नऊलाही डॉक्टर आले नाही. काही अपवाद वगळता बहुतांश डॉक्टरची एन्ट्री साडे नऊ वाजतानंतर सुरू झाली. वास्तविक, बाह्य रुग्णांना तपासणीची वेळ ही सकाळी ८.३० ते १२.३० वा १ वाजतापर्यंतची आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी कधीही ही वेळ पाळत नसल्याने अनेक अडचणी येत असल्याचे काही रुग्णांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक गैरहजर होते. ते औरंगाबादला बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक मागील काही दिवसांपासून सुटीवर असल्यामुळे त्यांचा प्रभार ज्यांच्याकडे आहे त्यासुद्धा वेळेत उपस्थित झालेल्या नव्हत्या. त्यांच्या कक्षासमोर विचारले असता मॅडम आता येईल, असे सांगण्यात आले. त्यांची काहीवेळ वाट बघितली असता त्या यायच्याच होत्या. वरिष्ठ अधिकारीच वेळेच्या बाबत उदासीन असल्यामुळे इतर वैद्यकीय अधिकारी वेळ पाळत नसल्याचेही चित्र या ठिकाणी बघायला मिळाले.
रुग्णालय परिसरात फेरफटका मारला असता रुग्णालय की कचरा डेपो हे कळायला मार्ग नव्हता. रुग्णालयाच्या इमारत क्र. १ मध्ये प्रसुती वॉर्ड आहे. त्याच्यापुढे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना भरती ठेवण्यात येते. या दोन्ही इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली होती. या परिसरातून नाकावर रुमाल ठेवल्याशिवाय जाता येत नव्हते. या घाणीचा आणि दुर्गंधीच्या नवजात शिशूसह त्याच्या मातेला सामना करावा लागत होता. इमारतीच्या खिडक्याही घाणीने माखलेल्या अवस्थेत दिसून आल्या.
काही रुग्णांशी संवाद साधला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी नियमित होत नाही. त्यामुळे त्याविभागात कार्यरत परिचारिकाच सेवा देण्याचे काम करतात. त्यांच्यावरही कुणाचा वचक नसल्यामुळे त्यांचा रुग्णांशी व्यवहार जेमतेमच असतो. त्यामुळे आपल्या व्यथा कुणाला सांगाव्यात हे कळत नसल्याचे काही रुग्णांनी ‘लोकमत’ चमूशी बोलताना सांगितले.
औषधांची खरेदी आता केंद्रीय पद्धतीने होत असल्यामुळे सप्टेंबर ते आॅगस्ट अशी मागणी करण्यात येते. त्यानुसार औषधांना पुरवठा केला जातो, असे सांगण्यात आले. तुटवडा भासल्यास नऊ लाख रुपयांची तरतूद असल्याचेही सांगण्यात आले. यामुळे औषधांचा तुटवडा भासत नसल्याचे दिसून आले.(लोकमत न्यूज नेटवर्क)