डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने घेतला बालकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:00 AM2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:00:26+5:30
नजीकच्या टाळळी येथील किशोर नवघरे यांचा मुलगा श्रेयस (१६) याच्या पोटात बुधवारी पहाटेच्या सुमारास तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला झडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आरोग्य केंद्रात डॉ. रवींद्र देवगडे उपस्थित नसल्याने आरोग्य सेवकाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार श्रेयसवर उपचार सुरु केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
झडशी : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत आरोग्य सेवेकाने उपचार केल्याने बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून मृताच्या नातेवाईकांनी आरोग्य केंद्रात तोडफोड केली. बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नजीकच्या टाळळी येथील किशोर नवघरे यांचा मुलगा श्रेयस (१६) याच्या पोटात बुधवारी पहाटेच्या सुमारास तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याला झडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. यावेळी आरोग्य केंद्रात डॉ. रवींद्र देवगडे उपस्थित नसल्याने आरोग्य सेवकाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार श्रेयसवर उपचार सुरु केले. त्याला एक इंजेक्शन व गोळ्या दिल्यानंतर ते घराकडे परत आले. काही वेळात पुन्हा असह्य वेदना सुरु झाल्यामुळे त्याला आरोग्य केंद्रात नेत असताना श्रेयसचा वाटेतच मृत्यू झाला. डॉ. रवींद्र देवगडे यांच्या अनुपस्थितीत आरोग्य सेवकाने दिलेल्या इंजेक्शनमुळेच श्रेयसचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्रात जावून साहित्याची तोडफोड करीत काहींनी आरोग्य सेवकालाही मारहाण केली. या तणावपूूर्ण वातावरणाची माहिती वरिष्ठांना मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांच्यासह सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्निल बेले, काँग्रेस नेते, शेखर शेंडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय जयस्वाल, जि.प. सदस्य सौरभ शेळके, जि.प. सदस्य संजय शिंदे, टाकळीचे भूषण पारडकर, अंतरगावचे सरपंच बाबा उडाण, भाजपा तालुका अध्यक्ष अशोक कलोडे, पोलीस अधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या दरम्यान डॉ. देवगडे यांना निलंबित केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर नागरिकांचा रोष कमी झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. सहा दिवसांपासून परिचारिकांचा संप असल्याने वडगावचा आरोग्य सेवक भगत यांची रात्रपाळी ड्युटी होती. तिसरे वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे.
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत आरोग्य सेवकाने उपचार केले पण, बालकाचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी केली जाईल. मृताची उत्तरीय तपासणी झाली असून प्राप्त अहवालानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.