बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 10:44 AM2021-12-17T10:44:53+5:302021-12-17T11:17:48+5:30

बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या दहावीतील विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा (ट्युमर) आढळून आला. येथील डॉक्टरांनी तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न करून यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले.

doctors remove football-shaped ball from girls stomach | बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

googlenewsNext
ठळक मुद्देडॉक्टरांनी दिले जीवदानआर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन तास शस्त्रक्रिया

वर्धा : सरकारी रुग्णालय म्हटले की अनेकजण नाक मुरडतात. तिथे जायचे टाळून खासगी रुग्णालयाची वाट धरतात. मात्र, सर्व सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांची चमू असली की अशक्य गोष्टीही शक्य होऊन जातात. अशीच प्रचिती आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात आली. बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या दहावीतील विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा (ट्युमर) आढळून आला. येथील डॉक्टरांनी तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न करून यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले.

आर्वी तालुक्यातील धनोडी (नांदपूर) येथील मुलगी आर्वीच्या मॉडेल शाळेत दहावीचे शिक्षण घेत आहे. बऱ्याच दिवसांपासून तिच्या पोटात गोळा असल्याने ती त्रस्त होती. अनेक रुग्णालयांत तिला दाखविण्यात आले; पण आराम पडला नाही. शस्त्रक्रिया करून तो गोळा बाहेर काढण्यासाठी मोठा खर्च असल्याने पालकही विचारात पडले होते. अखेर आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल केले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याने कुटुंबीयांना सांगितले.

शस्त्रक्रिया सांगताच पालकांचा धीर खचला. परंतु, डॉक्टरांनी महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केली जाईल, त्यामुळे खर्चाकरिता घाबरण्याचे कारण नाही, असा धीर दिला. अखेर पालकांची संमती मिळाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. नीरज कदम, तज्ज्ञ डॉ. नरेंद्र गुप्ता, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रेखा कदम यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तब्बल दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेअंती पोटातून १० बाय ८ सेंटिमीटरचा गोळा बाहेर काढला. हा इतका मोठा गोळा कशाचा? असा प्रश्न डॉक्टरांनाही पडला असून, तो तपासणीकरिता पाठविण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोटात गोळा असल्याने मुलीला असह्य वेदना होत्या. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यावा लागला. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर गोळा बाहेर काढण्यात आला. हा गोळा पाहून आम्हीही विचारात पडलो.

डॉ. नीरज कदम, सर्जन व स्त्री रोग तज्ज्ञ, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी

माझे पोट खूप दुखत होते. अनेकदा डॉक्टरांना दाखविले; पण गोळ्यांनी आराम पडला नाही. डॉक्टरांनी ऑपरेशन करून तो गोळा बाहेर काढल्याने हलके वाटत आहे. आता प्रकृती चांगली आहे.

विद्यार्थिनी

Web Title: doctors remove football-shaped ball from girls stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य