तालुका कृषी कार्यालयातून कागदपत्रे जप्त
By admin | Published: August 28, 2016 12:36 AM2016-08-28T00:36:04+5:302016-08-28T00:36:04+5:30
जलयुक्त शिवार अभियानात कमांची देयके काढण्याकरिता लाच मागणाऱ्या कृषी विभागाच्या वर्धा तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
लाचप्रकरण : संगणकाचीही केली तपासणी
वर्धा : जलयुक्त शिवार अभियानात कमांची देयके काढण्याकरिता लाच मागणाऱ्या कृषी विभागाच्या वर्धा तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यातील तिघांना अटक करण्यात आली असून चवथा आरोपी फरार आहे. फरार आरोपीकडून कागदपत्रे गहाळ होण्याच्या शंकेवरून कार्यालयाला सील ठोकण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशान्वये शुक्रवारी ठोकण्यात आलेले सील शनिवारी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून काढण्यात आले.
या कार्यालयातून सायंकाळपर्यंत कागदपत्र तपासणी करून जप्तीची कार्यवाही सुरू होती. यात गुन्हा दाखल असलेल्या तीनही अधिकाऱ्यांच्या कक्षांची तपासणी झाली. या कक्षात असलेल्या विविध कपाटातील विविध कामासंदर्भातील कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. यात मोजमाप पुस्तिका, अंदाजपत्रक आदींचा समावेश आहे. शिवाय विभागात असलेल्या संगणकांचीही तपासणी करण्यात आली. या संगणकात तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती काढून ती लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्यावतीने जप्त करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या तपासणीकडे साऱ्यांचे लक्ष आहे.(प्रतिनिधी)
गुन्हा दाखल असलेल्या तिघांसह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती
कागदपत्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली त्यावेळी गुन्हा दाखल असलेले कृषी विभागाचे तीनही अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवाय यावेळी संबंधित विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक सारीन दुर्गे यांनी दिली.