साहेब.. आर्वीत उपजिल्हा रुग्णालयाला कोणी डॉक्टर देता का हो डॉक्टर ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:07 PM2024-07-22T17:07:21+5:302024-07-22T17:13:06+5:30

रुग्णालयाला रिक्त पदांचा आजार : तज्ज्ञ डॉक्टरांची तीन वर्षांपासून पदे आहेत रिक्त

Does anyone give a doctor to Arvi Upazila Hospital? | साहेब.. आर्वीत उपजिल्हा रुग्णालयाला कोणी डॉक्टर देता का हो डॉक्टर ?

Does anyone give a doctor to Arvi Upazila Hospital?

राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात मागील तीन वर्षांपासून रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. येथील अनेक विभागात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कोणी डॉक्टर देता का डॉक्टर? असे म्हणण्याची वेळ येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर ओढावली आहे.


सध्या पावसाळा सुरू झाल्याने विविध आजारांचे रुग्ण सतत वाढत आहेत. येथे एक वैयक्तिक अधीक्षक व सात वैद्यकीय अधिकारी अशी शासनाच्या नियमावलीतील पदे आहेत. मात्र, केवळ एक वैद्यकीय अधीक्षक आणि दोन वैद्यकीय अधिकारी यांच्याच भरवशावर या दवाखान्याचा डोलारा उभा आहे. या उपजिल्हा रुग्णालयास डॉक्टरच्या प्रतिनियुक्तीने आणि रिक्त पदांनी ग्रासले आहे.


तीन-चार वर्षांपूर्वी सर्व प्रकारच्या सोयी विविध प्रकारचे ऑपरेशन आणि सिझर व प्रसूतीसाठी नावाजलेले रुग्णालय होते. या ठिकाणी आर्वी, आष्टी, कारंजासह यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत होते. सद्यःस्थितीत उपचारास दिरंगाई होत असल्याने गरजू महिलांना प्रसूतीसाठी आता खाजगी दवाखान्याचा आसरा घ्यावा लागत आहे, तर अनेकांची परिस्थिती नसल्याने सावंगी सेवाग्राम येथे दाखल केले जात आहे. यात अपघातग्रस्त रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे.


२०१८ मध्ये झाली होती श्रेणीवर्धन
येथील उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटा मानकाप्रमाणे मंजूर आहेत. सन २०१८ मधे ५० खाटांवरून १०० खाटांमधे रुग्णालय श्रेणीवर्धित झाले होते. मात्र, या ठिकाणी नियुक्त पदे भरण्यात न आल्याने विविध रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.


एक पद करण्यात आले रद्द
रुग्णालयात आयजीएचएस स्त्रीरोगतज्ज्ञ पद तीन वर्षांपासून रिक्त असल्याने ते पद आता रद्द करण्यात आले आहे.


तीन वर्षांत झालेल्या प्रसूती
वर्ष                    एकूण                  सिझर

२०२१-२२            १०५६                     ६०८
२०२२-२३             ६४७                     २३२
२०२३-२४             ३०१                       33


दोनच डॉक्टरांवर रुग्णालयाचा भार
उपजिल्हा रुग्णालयात दोन डॉक्टरांवर रुग्णालयाचा कारभार आहे. एकाची दिवसपाळीत, तर एकाची रात्रपाळीत सेवा आहे. त्यात भरती रुग्णासह, आकस्मिक सेवांचा भारही त्यांच्यावरच असल्याने रुग्णांना सांभाळतांना डॉक्टरांची तारेवरची कसरत होते.


लोकप्रतिनीधींचे प्रयत्न पडले थिटे
रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले, मात्र सुविधा अजूनही सर्वसामान्यांना मिळत नाही. या रुग्णालयाच्या खाटांच्या संख्येत वाढ करण्यासाठी स्थानिक लोकप्र- तिनिधींनी प्रयत्न केले. मात्र, ते अद्यापही कागदोपत्रीच असल्याने तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न जशास तसा आहे. लोकप्रतिनीधींनी केलेले प्रयत्न थिटे पडल्याने स्थितीत बदल होत नसल्याचे बोलले जात आहे.


"स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ गेडाम हे रुजू झाले असून, आता येथे दर बुधवारी पूर्वनियोजित सिझर (प्रसूती शस्त्रक्रिया) करणे सुरू झाले आहे. करिता जनतेने याचा लाभ घ्यावा. नवीन पाच डॉक्टर आले आहेत."
-डॉ. मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, आर्वी

Web Title: Does anyone give a doctor to Arvi Upazila Hospital?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.