हिंगणघाट शहरात नशेखोरांमध्ये फेमस होतेय 'कुत्ता गोळी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 04:12 PM2021-08-11T16:12:55+5:302021-08-11T16:16:01+5:30
Wardha New औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. मात्र, आता कुत्ता गोळीची क्रेझ हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: शासनाने प्रतिबंध घातलेल्या गोळ्यांची हिंगणघाट शहरात बेकायदा विक्री सुरू असून या औषधांचा वापर तरुणपिढी नशेसाठी करीत असल्याची माहिती आहे. हिंगणघाट शहरातील काही विक्रेते दहा ते वीस पट किंमत आकारुन या औषधांची विक्री करीत आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे सारं घडत असतानाही कारवाई मात्र, कुठेच दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. खोकल्याची औषधे, झोपेची औषधे, यासाठी वापरली जातात. सराईत गुन्हेगारांबरोबरच महाविद्यालयीन विद्याथीर्ही या नशेचे शिकार झाले आहेत. मात्र, आता कुत्ता गोळीची क्रेझ हिंगणघाट शहरात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही गोळी अधिक चर्चेत आली असून आता तिचे दुष्परिणामही शहरातील गुन्हेगारी जगतात दिसून येत आहे.
काय आहे कुत्ता गोळी?
औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापर करण्यास सुरुवात केली. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधीर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते. तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला कुत्ता गोळी असे म्हटलं जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो. निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते. या नियंत्रणहीन झालेल्या व्यक्तीच्या भावना भडकल्यास ती कोणतेही कृत्य करण्यास उद्युक्त होते.
पोलिसांचे खबरे अलर्ट
शहरात प्रतिबंधित औषधांचा वापर नशेसाठी सुरू असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनाही असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांनी जात पाहणी केली. इतकेच नव्हेतर औषधी दुकानांमध्येही जात याबाबतची विचारपूस केली. विक्री होणा?्या या गोळ्या नेमक्या येतात तरी कुठून याबाबतचा शोध पोलीस घेत आहे. यासाठी पोलिसांनी शहरात खबरे देखील कामाला लावले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.