वर्ध्यात येणारा देशी-विदेशी दारुसाठा पोलिसांनी पकडला; कारसह ७.३४ लाखांचा दारुसाठा जप्त
By चैतन्य जोशी | Published: April 9, 2023 12:07 PM2023-04-09T12:07:05+5:302023-04-09T12:07:18+5:30
दोघांना ठोकल्या बेड्या
वर्धा : शहरात येणारा देशी, विदेशी दारुसाठा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडला. ही कारवाई डिव्हीजन पथकाने ८ रोजी पिपरी गावातील प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर केली. याप्रकरणी कारसह ७ लाख ३४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केल्याची माहिती दिली.
इमरान अयुब खान पठाण (२४) रा. राणी दुर्गावती नागर वर्धा आणि गोविंदा फकिरदास जाधव (३२) रा. वडर झोपडपट्टी आर्वी नाका असे अटक आरोपींची नावे आहे.
आर्वी नाका परिसरातील रहिवासी गोविंदा जाधव याच्याकडे दारुसाठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी पिपरी मेघे गावात नाकाबंदी केली असता एम.एच. ३२ वाय. २५४१ क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारुसाठा आढळून आला. पोलिसांनी कारसह दारुसाठा जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमर लाखे, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, राजू वैदय, प्रमोद वाघमारे यांनी केली.
बार मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
आरोपी इमरान पठाण याने देशी, विदेशी दारुसाठा हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावात असलेल्या सुरेश जयस्वाल यांच्या बारमधून आणल्याची माहिती पोलिसांना दिली. बार मालक सुरेश जयस्वाल याने देशी विदेशी दारुसाठा दिल्यामुळे बारमालकाला गुन्ह्यात आरोपी बनवून त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.