दोन कोटींच्या निधीतून घोराडचा चेहरा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:02 AM2018-09-19T00:02:36+5:302018-09-19T00:07:19+5:30
घोराड येथील बोरनदी परिसरात घाट बांधकाम व अन्य कामाकरिता २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी पर्यटन विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घोराड येथील बोरनदी परिसरात घाट बांधकाम व अन्य कामाकरिता २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी पर्यटन विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार यांच्या उपस्थितीत नुकताच करण्यात आला. या कार्यक्रमाला घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, जि.प. च्या महिला बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, भाजपा तालुकाध्यक्षा अशोक कलोडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले की, वर्धा विधानसभा मतदार संघात रस्ते, प्रवासी निवारा, पांधण रस्ते, स्मशानभूमी, ग्रामपंचायत अंतर्गत येणारी विकास कामे, पाणी पुरवठा योजना यासाठी आ. पंकज भोयर यांनी आणलेला निधी यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी आणलेल्या निधीपेक्षा खूप मोठा आहे म्हणून ते खरे कार्यसम्राट आहे.
यावेळी आ. समीर कुणावार म्हणाले आ. पंकज भोयर हे विकासकामांच्या निधीसाठी नुसताच पाठपुरावा करीत नाही तर प्रसंगी तो निधी भांडून सुध्दा आणतात. त्यामुळे त्यांच्यात व माझ्यात निधीसाठी नेहमीच चुरस असते. पण एकाच घाटाच्या बांधकामासाठी २ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी आणून माझ्यापेक्षा आ. भोयर हे सरस ठरले यात शंका नाही.
यावेळी आ. पंकज भोयर म्हणाले, काही विरोधक मित्र मला कुदळ मारणारा आमदार म्हणून हिणवतात, पण मी पैसा आणल्याशिवाय कुदळ मारत नाही, असे ठणकावून सांगत सेलू तालुक्यातील जनतेच्या विकासकामांसाठी सदैव प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही दिली.
यावेळी बबनराव माहुरे गुरूजी, डॉ. सुरेंद्र भुते, सुधाकर खराबे, दीपक झोरे, जितेंद्र पवार, विकास मोटमवार, अरूण तडस, प्रदीप तेलरांधे, धनराज वांढरे, चैतकरण गांजरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. संचालन प्रा. विनोद धानकुटे तर आभार आशीष डोळसकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय तडस, विलास वरटकर, पवार, जाधव आदींनी परिश्रम घेतले.