डोअर टू डोअर सर्व्हेत ३,००९ संशयित कुष्ठरूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:35 PM2017-09-14T23:35:36+5:302017-09-14T23:36:26+5:30
कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे.
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कुष्ठरूग्णांचे प्रमाण कमी करण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने पंधरा दिवस जिल्ह्यात डोअर टू डोअर सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेच्या आठ दिवसात बुधवारपर्यंत ३,००९ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील काहींची तपासणी केली असता ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या गतवर्षीच्या सर्व्हेच्या तुलनेत कमी असली तरी कुष्ठरुग्णाच्या प्रमाणाचे शुन्य गाठने सध्या तरी शक्य नसल्याचे दिसत आहे.
शासनाच्यावतीने विविध योजना राबवून कुष्ठरुग्णांचे प्रमाण दिलेल्या मानकाच्या तुलनेत आणण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. आरोग्य संस्थेने दिलेल्या मानकानुसार १० हजार रुग्णांमागे १ पेक्षा कमी रुग्ण असणे अपेक्षित आहे. मात्र वर्धेत तसे नसल्याचे दिसते. जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचे प्रमाण झालेल्या सर्व्हेनुसार १.४० एवढे असल्याचे दिसून आले आहे. असलेले प्रमाण कमी करण्याकरिता शासनाच्यावतीने डोअर टू डोअर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. या सर्व्हेकरिता १ हजार २९२ चमू कार्यरत आहेत. या चमूत एक महिला आणि एका पुरूष कर्मचाºयाचा समावेश आहेत. या चमूने आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४७२ घरांची तपासणी केली आहे. संशयित असलेल्या रुग्णांपैकी ३५ जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचे सामोर आले. या रुग्णांवर कुष्ठरोग विभागाकडून औषधोपचार करण्यात येत आहे. ही मोहीम २० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आढळले नऊ रूग्ण सांसर्गिक
राबविण्यात आलेल्या सर्व्हेत ३५ नवे रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९ जणांना असलेला कुष्ठरोग सांसर्गिक असल्याचे दिसून आले आहे. आणखी पाच दिवसाचा कालावधी बाकी आहे, यात किती रुग्ण आढळतात यावर जिल्ह्याची टक्केवारी ठरणार आहे.
१९ हजार ८०५ घरांवर ‘एक्स’चे निशाण
या मोहिमेदरम्यान बंद असलेल्या घरांवर ‘एक्स’चे निशाण करण्यात आली. या घरांना पुन्हा भेट देत १३ हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
२,५८४ कर्मचारी देणार ३.०६ लाख घरांना भेटी
शासनाच्या आदेशानुसार होणाºया या सर्व्हेत पंधरा दिवसात ३ लाख ६ हजार १९० घरांना भेटी देण्यात येणार आहे. याकरिता २ हजार ५८४ कर्मचारी कार्यरत आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत १ लाख ६२ हजार ४७२ घरांना भेटी देण्यात आल्या.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून अनेक गैरसमज दूर होऊन नागरिकांत जनजागृती होत असून नागरिक स्वत: तपासणी करीत आहे.
- के.झेड. राठोड, सहाय्यक संचालक,
कुष्ठरोग, वर्धा