दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कब्जा - डॉ. अभय बंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 05:28 PM2023-02-04T17:28:17+5:302023-02-04T17:34:00+5:30
प्रगट मुलाखतीत घातला विविध मुद्द्यांवर हात
राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : महाराष्ट्र सध्या मद्यराष्ट्र झाले आहे. २ लक्ष कोटी रुपयांची दारू महाराष्ट्रातील लोक पित आहेत. दारूनं लोकशाही भ्रष्ट झाली असून दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्रातील साऱ्याच पक्षांचं राजकारण चालत आहे. दारू आणि बंदी हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. मात्र बंदीच्या नावावर दोघांनाही एकत्रित केले जात आहे. असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी म्हटले आहे.
९६ व्या मराठी साहित्य संमेलनात प्रगट मुलाखतीत बोलताना त्यांनी या विषयावर भाष्य केले. डॉ. बंग म्हणाले की, ३५ वर्षे वर्धा, सेवाग्राम परिसरात मी जगलो, आज साहित्य संमेलनाच्या रूपाने आईकडे परत आल्याचा आनंद आहे. गांधी, विनोबांच्या संस्था महिलाश्रम, गोपुरी, सेवाग्राम येथे मी वाढलो, गांधींची उपस्थिती नेहमीच मला येथे जाणवत राहिली. विनोबांचे वर्धेवर नेहमीच लक्ष होते. अर्धे वर्धा शहर त्यावेळी गांधी टोपीने भरलेले होते. कमीत कमी गरजांमध्ये कुटुंब चालविण्याचा धडा मला सांगितला. भूदान पदयात्रेच्या निमित्ताने खेड्यात जाता आले. त्यांना समजून घेता आलं. वयाच्या १३ व्या वर्षी माझे मोठे बंधू अशोक बंग यांनी शेती सुधारतो, असे सांगितले. त्यामुळे मला भारताचे आरोग्य सुधारण्याचे काम हाती घ्यावे लागले.
खरं तर मला लेखक व्हायचे होते, लेखक झाल्यावर दिवसभर बसून पुस्तक वाचण्याचे काम हे माझं आवडतं काम होतं. पुस्तकाच्या जगात मी माझी शाळा चालविली. साने गुरुजी, गो. नि. दांडेकर, वि. स. खांडेकर यांच्या पुस्तकांतून ध्येयवाद शिकता आला. अनुवादित साहित्य वाचले. या कालखंडात मी तीन राज्यांतून घडलो. पहिले मध्यप्रदेश, विदर्भ या सीपी ॲण्ड बेरार ४३ जिल्हे होते. महाराष्ट्रात आल्यावर २६ जिल्हे झाले. तीन राज्यांतून माझं जीवन गेले असले तरी मी माझी अस्मिता संकुचित ठेवली नाही. महाराष्ट्राच्या माझ्यावर अनंत उपकार आहेत. ललित साहित्य वाचताना मुलांची कल्पनाशक्ती वाढली. त्यातूनच महा रोमॅन्टिक आदर्शवाद मिळाला. वैचारिक जडण-घडण विनोबा व गांधींच्या साहित्यातून मिळाली. सूत कताईतून गणिताचे शिक्षण मिळाले. नई तालीमच्या शेती शाळेतून व्यवहाराचे आर्थिक ज्ञान मिळाले. पदयात्रेतून अनेक गाेष्टी शिकलो.
इंग्रजी न शिकण्याच्या निर्णयाला शाळेनं दिला पाठिंबा
मी पहिल्यांदा नई तालीममध्ये दाखल झालो. तेथे इंग्रजी न शिकण्याचा निर्धार मी जाहीर केला. कारण ती इंग्रजांची भाषा होती. गांधींनी त्यांच्याविरुद्ध लढा दिला होता. म्हणून माझा इंग्रजी न शिकण्याचा आग्रह होता व हा माझा आग्रह शाळेनं मान्य केला, माझ्या भूमिकेचे समर्थन केले, असेही बंग यांनी सांगितले.
मृत्यूला दारू आणि तंबाखू कारणीभूत
जगात होणारे मृत्यू पहिल्या पाच ते सात कारणात दारू आणि तंबाखू हे कारणीभूत आहे. याबाबत २०१७ मध्ये व्यापक अभ्यास करण्यात आला. अनेक लोक व्यक्तिगत मद्य सेवनासाठी स्वातंत्र्याचा उल्लेख करतात. अशा उनाड व्यक्तींच्या इच्छेपेक्षा समाजहिताला प्राधान्य दिले पाहिजे. आज दारू पिणाऱ्या कुटुंबातील अनेक स्त्रियांना होणारा त्रास मी जवळून पाहिला आहे. नवरा मेला तरी चालेल, अशी त्यांची आकांक्षा तयार होते. इथपर्यंत भारतीय व्यवस्था घसरलेली आहे. दारू पिणारे अडाणी आहेत, असेही बंग यांनी यावेळी सांगितले.
पहिले संशोधन लढा यशस्वी
१९८० मध्ये शेतमजुरांना ४ रुपये रोज दिला जात होता. वि. स. पागे यांच्या समितीच्या चुकीमुळे या विषयावर अनेक वर्षे लढा देऊनही यश येत नव्हते. मात्र याबाबत व्यापक संशोधन आपण केले व ती भूमिका महाराष्ट्रातील तमाम जनता, माध्यम यांनी उचलून धरली. त्यानंतर शेतमजुरीचा दर किमान रोज १२ रुपये झाला. लोकांमध्ये जाऊन त्यांना समजून घेऊन त्यांच्यातील प्रश्न जाणून घेऊन संशोधन करण्याची गरज आहे. मात्र आज असे संशोधन होताना दिसत नाही. अशी खंत बंग यांनी व्यक्त केली. तरुणांकडे आज जगण्याला प्रयोजन नाही. त्यांचं जीवन सार्थक करण्यासाठी निर्माणच्या माध्यमातून सर्चमध्ये काम केले जात आहे. देशपातळीवरचे तरुण या कामात गुंतले आहेत, असेही बंग यांनी सांगितले.
तर होईल दारूबंदी यशस्वी
गडचिरोली व वर्धा हे दोन दारूबंदी असलेले जिल्हे आहेत. शासकीय पातळीवरून जिल्हा दारूबंदी आवश्यक आहे. त्यानंतर गाव स्तरावर व व्यक्ती स्तरावर दारूबंदी झाली. तर दारूबंदीचा प्रयोग यशस्वी होतो. गडचिरोली जिल्ह्यात ६०० गावं दारूबंदीची कठोर अंमलबजावणी करीत आहेत, असा दावाही डॉ. बंग यांनी केला.