डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे
By admin | Published: April 5, 2017 12:42 AM2017-04-05T00:42:09+5:302017-04-05T00:42:09+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीपूर्वी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात मिळावे
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मार्च महिन्याच्या वेतनाची प्रतीक्षा
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीपूर्वी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन देण्यात मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्यावतीने निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस गजानन थुल, जिल्हाध्यक्ष संजय तायडे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आलेले निवेदन अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनी स्वीकारले.
दरवर्षी मार्च महिन्याचे वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करण्याचे प्रावधान आहे. त्यानुसार मार्च २०१७ चे वेतन सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी देण्याची व्यवस्था करावी. शासन परिपत्रकात १ तारखेला वेतन अदा करावे अशी तरतुद आहे. परंतु आजवर १ तारखेला वेतन झालेले नाही. मार्च महिन्याचे वेतन दरवर्षीच रखडते. कर्मचाऱ्यांना होणारी गैरसोय टाळण्यात यावी. तसेच वेतन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी करण्याचे प्रयन करावे, अशी मागणी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे गरजेचे ठरते. महसुल विभाग, जिल्हा परिषद विभाग, पाटबंधारे विभाग व जिल्ह्यातील विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. कर्मचाऱ्यांची अडचण लक्षात घेता प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करुन वेतन त्वरीत देण्याची मागणी निवेदनातून केली. शिष्टमंडळात महसूल विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष सत्यजीत भोतमांगे, महेंद्र फुलझेले, मीरा मेश्रामकर, अनिल वाळके, जिल्हा कार्याध्यक्ष शशीकांत अडसड, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, राहुल वाकडे, अशोक म्हैसकार, धर्मपाल कांबळे, मधुकर ठाकरे, कास्ट्राईब जि.प. विभागाचे अध्यक्ष अशोक वासनिक आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)