डॉ. आंबेडकर हे खरे राष्ट्रनिर्माते होते
By admin | Published: April 12, 2017 12:25 AM2017-04-12T00:25:52+5:302017-04-12T00:25:52+5:30
जो इतिहासाचे अवलोकन करतो, तोच इतिहास बदलवतो, जो समाजाचं अध्ययन करतो, तो समाज बदलवतो आणि जो धर्माचा अभ्यास करतो तो धर्म सुद्धा बदलवतो, ...
मैत्रीवीर नागार्जून : ‘डॉ. आंबेडकर : राष्ट्रवाद, लोकशाही व बौद्धधर्म’वर व्याख्यान
वर्धा : जो इतिहासाचे अवलोकन करतो, तोच इतिहास बदलवतो, जो समाजाचं अध्ययन करतो, तो समाज बदलवतो आणि जो धर्माचा अभ्यास करतो तो धर्म सुद्धा बदलवतो, अशी क्रांतीकारी व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय, असे मत हैद्राबाद येथील सेंट्रल विद्यापीठाचे प्रा. डॉ. मैत्रीवीर नागार्जून यांनी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीसह त्रिरत्न व बौद्ध महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विद्यादीप सभागृहात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेत ‘डॉ. आंबेडकर : राष्ट्रवाद, लोकशाही आणि बौद्धधर्म’ विषयावर ते बोलत होते. पहिल्या दिवशी धम्मचारी नागकेतू तर दुसऱ्या दिवशी हिंदी विद्यापीठाचे डॉ. सुरजित अध्यक्षस्थानी होते.
डॉ. नागार्जून पूढे म्हणाले की, डॉ. आंबेडकर हे एक महान राष्ट्रनिर्माते होते. लोकशाही व बौद्धधर्माला अभिप्रेत खऱ्या राष्ट्रवादाचा पाया त्यांनी घातला. आजचा असमानतायुक्त राष्ट्रवाद त्यांना अभिप्रेत नव्हता. घटनेच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या मुल्यांचा अंतर्भाव असला तरी या मुल्यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी वेगळी होती. अमर्याद स्वातंत्र्य हे समतेच्या तत्वाला संकुचित करू शकते म्हणून बंधुत्वाची गरज त्यांनी प्रतिपादन केली. केवळ बंधुत्व हे सुद्धा पुरेसे नसून त्याला मैत्रीची जोड त्यांनी दिली आणि म्हणून बुद्धाच्या तत्वावर हे तीनही मुल्ये आधारित आहेत, हे त्यांनी जगाला निक्षून सांगितले. आज मात्र आपल्या मताशी सहमत नसणाऱ्यांची अराष्ट्रीय वा राष्ट्रद्रोही, अशी निर्भत्सना केली जाते. हा लोकशाहीचा संकोच आहे. म्हणून समतायुक्त समाजाची निर्मिती करणे हाच डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत राष्ट्रवाद आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी नरेन मून व प्रा. गौतम तेलतुबंडे यांनी संपादित केलेल्या बौद्ध जीवन मार्ग या उर्गेन संघरक्षित यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविक त्रिरत्न बौद्ध महासंघ वर्धा केंद्राचे अध्यक्ष धम्मचारी हर्षवरी यांनी केले तर आभार वर्धा बुद्धीष्ट सेंटरचे अध्यक्ष धम्मचारी मंजूकिर्ती यांनी मानले. वक्त्यांचा परिचय व कार्यक्रमाचे संचालन प्रा. ज्ञानेन्द्र मुनेश्वर यांनी केले. दोन्ही दिवसाच्या व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थित, हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.(कार्यालय प्रतिनिधी)