डॉ. कदम यांनी केलेल्या चुकीच्या उपचाराने सात वर्षीय मुलीला अंधत्व; ठोठावला होता २५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 07:45 AM2022-01-16T07:45:00+5:302022-01-16T07:45:02+5:30
Wardha News वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीतील गर्भपात प्रकरण पेटले असतानाच, डॉ. कुमारसिंग कदम यांच्या चुकीने एका चिमुकल्या मुलीला कायमचे अंधत्व आल्याचे प्रकरण समोर आले आहे.
पुरुषोत्तम नागपुरे
वर्धा : सात वर्षीय मुलगी आपल्या आजोबासोबत वसंतनगर येथे दिवाळीसाठी आली होती. तिला ताप आल्याने डॉ. कुमारसिंग कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, चुकीच्या पद्धतीने केलेल्या औषधोपचारामुळे मुलीच्या दोन्ही डोळ्यांंना पूर्ण अंधत्व येऊन ती आंधळी झाली. ही घटना २००८ मध्ये घडली होती. याप्रकरणी कन्झ्युमर प्रोटेक्शन १९८६ सेक्शन १७अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नागपूर येथे नुकसानभरपाईसाठी याचिकाही दाखल करण्यात आली होती. हे विशेष.
ऋतुजा खारकर ही सात वर्षीय मुलगी २००८ मध्ये दिवाळ सणानिमित्त आजोबा हरिभाऊ पाचारे यांच्या घरी आली होती. दरम्यान तिला ताप आला असता कुमारसिंग कदम यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथे झालेल्या चुकीच्या औषधोपचारामुळे तिला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग नागपूर येथे नुकसानभरपाईसाठी ऋतुजा खारकरतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती. नागपूर खंडपीठाने डॉक्टर कदम यांनी चुकीचा औषधोपचार केला असा निर्णय देत २५ लाख रुपयांचा दंड आणि १४ सप्टेंबर २००९ पासून ९ टक्के व्याजाची रक्कम तसेच पीडितेच्या आईला २० हजार रुपये नुकसानभरपाई पोटी देण्याचा आदेश दिला होता.
परंतु, डॉक्टर कदम यांनी दंडाची रक्कम न भरता त्यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली खंडपीठाकडे वर्ष २०१७-१८ मध्ये अपील केले आहे. याप्रकरणात मागील तीन वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मुलीच्या वडिलांचा पहिल्या लाटेतच कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पीडित मुलीच्या आईची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये दिल्ली येथे ये-जा करण्यासाठी खर्च करण्याचीही परिस्थिती नाही.
नातलगांकडून उसनवारीने पैसे घेऊन न्यायालयाचा खर्च भागविणे सुरू आहे. अधिकचे पैसे नसल्यामुळे तारखेवर स्वतः किंवा नातेवाइकाला पाठवू शकत नाही. आईच्या मदतीशिवाय अंधत्व आलेली ऋतुजा ही काहीच करू शकत नसल्याने तिचे उर्वरित आयुष्य कसे जाईल, यासाठी तिच्याकडे कोणताही मार्ग नसून जीवन जागावे कसे, हा प्रश्न तिच्यापुढे उभा आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोग दिल्ली खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी तत्काळ प्रकरण निकाली काढून मुलीसह तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी ऋतुजाची आई संगीता खारकर तसेच आजोबा हरिभाऊ पाचघरे यांनी केली आहे.