लघु पाटबंधारे विभागाच्या नालीचा झाला नाला
By admin | Published: May 29, 2017 01:13 AM2017-05-29T01:13:12+5:302017-05-29T01:13:12+5:30
जलयुक्त शिवार अभियान राबविणे सुरू आहे; पण यात काही विपरित परिणाम होत असल्याचे दिसते.
अर्धा एकर शेताचे नुकसान : नालीचे सिमेंटीकरण करण्याकडे वर्षभरापासून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : जलयुक्त शिवार अभियान राबविणे सुरू आहे; पण यात काही विपरित परिणाम होत असल्याचे दिसते. येथील शेतकरी दिनेश दमडू डायरे यांचे सर्व्हे क्र. ७२/१ मध्ये ४ एकर शेत असून शेतातून कालवा गेला आहे; पण समोर जागा नसल्याने कालव्याचे पाणी काढण्यासाठी शेतातून नाली काढली होती. या नालीचा नाला झाला. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
कालव्याचे पाणी वाहून जावे म्हणून शेतातून नाली करण्यात आली. या बाबीस एक वर्षाचा कालावधी लोटला. नाली करीत असताना लघु पाटबंधारे विभागाला कळविण्यात आले होते. यावर अधिकाऱ्यांनी नालीचे सिमेंटीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले होते; पण अद्याप बांधकाम करण्यात आले नाही. परिणामी, मागील हंगामात पाणी सोडल्यामुळे नालीचा नाला झाला आहे. सदर नालीचे आणखी काही दिवस बांधकाम न झाल्यास नाला आणखी रूंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्याचे तब्बल अर्धा एकर शेतजमीन खराब झाली आहे. यामुळे नुकसान सोसावे लागत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नालीचे बांधकाम त्वरित करावे व शेताची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
शासकीय विभागाला जागा देणे पडले महाग
दिनेश डायरे यांच्या शेतातून कालवा गेला आहे. या कालव्याचे पाणी काढण्याकरिता समोर जागा नसल्याने सदर शेतकऱ्याच्या शेतातून नाली करण्यात आली होती. यासाठी सदर शेतकऱ्याने कुठलीही हरकत घेतली नाही. शासकीय विभागाला विनामूल्य जागा देत नाली करण्यास सांगितले; पण वर्षभरापासून नालीचे सिमेंटीकरण करण्यात आले नाही. यामुळे कालव्याच्या पाण्यामुळे नालीचा नाला होऊन शेताचे मोठे नुकसान झाले.