नाल्या तुंबल्याने सांडपाणी साचले
By admin | Published: June 7, 2017 12:40 AM2017-06-07T00:40:15+5:302017-06-07T00:40:15+5:30
नगरपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नगरपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील प्रभाग क्र. १ आणि जयस्वाल ले-आऊट परिसरात सांडपाणी साचले आहे. येथे सांडपाणी वाहुन जाण्यासाठी पक्क्या नाल्या बांधलेल्या नसल्याने सांडपाणी साचुन सर्वत्र डबके तयार झाले आहे. चिखल, वाढलेले गवत यामुळे येथे डासांचा उपद्रव वाढला असून येथील रहिवाशांना संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्वरीत उपाययोजना नगरपंचायतीने करावी अशी मागणी आहे. येथे विकासकामाचा बराच अनुशेष असल्याने या परिसरात पाय ठेवल्यावर एखाद्या दुर्गम खेड्यात आल्याचा प्रत्यय येतो. नागरिकांच्य्या घरातील सांडपाणी रस्त्यावरुन वाहते. येथे पक्क्या नाल्या नसल्याने सर्वत्र गटारगंगा दिसते. वराह व मोकाट जनावरांचा या डबक्यात ठिय्या असतो. डासांमुळे झोप लागत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहे. प्रभागाच्या नगरसेवकाकडे तक्रार केल्यास कोणतीच कार्यवाही होत नसून येथे साथरोगाने थैमान घातल्यास कार्यवाही करणार का, असा प्रश्न रहिवाशी उपस्थित करतात.