टिळक पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:18+5:30
टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वच्छ सर्वेक्षणात केवळ नावालाच स्वच्छता करून क्रमांक मिळविणाऱ्या नगरपालिकेच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेने कळस गाठला आहे. गोल भाजी बाजाराला घाणीने विळखा घातल्याने टिळकांच्या पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत. पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या संवेदना मात्र बोथट झाल्याचे दिसून येत आहे.
टिळकांच्या नावाने ओळखल्या जाणाºया गोल भाजी बाजारात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा अर्धाकृती पुतळा पालिकेच्या वतीने कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. या पुतळ्यालाच हल्ली घाण, कचऱ्याने विळखा घातलेला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांकडून सडकी फळे आणि भाजीपाला व अन्य प्रकाराचा कचरा पुतळा परिसरातच आणून टाकला जातो. या परिसरातील इतर व्यावसायिकही गोल बाजाराच्या मागील परिसरात प्लास्टिक व अन्य प्रकारचा कचरा आणून टाकतात. हा कचरा सडल्यानंतर या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. व्यावसायिकांकडून टाकल्या जाणाºया सडक्या, भाजी फळांवर मोकाट जनावरे उच्छाद घालत असतात. मात्र, पालिकेकडून परिसराची नियमित स्वच्छता केली जात नसल्याचे येथील चित्र पाहिल्यावर निदर्शनास येते. केवळ जयंती आणि पुण्यतिथीलाच पालिकेकडून हा परिसर स्वच्छ केला जातो. इतरवेळी स्वच्छतेकडे कानाडोळा केला जातो. येथे टाकल्या जाणाºया कचऱ्यात प्लास्टिकचे मोेठे प्रमाण असल्याने प्लास्टिकबंदीचा फज्जा झालेला पाहायला मिळतो. शहरातील गोल बाजारात भाजी खरेदी करण्याकरिता येणाºया ग्राहकांची मोठी संख्या आहे. या ग्राहकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गोलबाजाराचे मागील लोखंडी प्रवेशद्वार कधीचेच मोडकळीस आले. परिणामी, मागील भागातून जनावरे पुतळा परिसरात शिरतात आणि घाण करतात. मात्र, पालिकेकडून पुतळ्याच्या देखभाल, सुरक्षा आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. महादेवपुरा, शहर पोलिस ठाणे परिसर, हवालदारपुरा, मालगुजारीपुरा, रामनगर, श्रावणे ले-आउटसह शहरातील इतर वॉर्डातही कचºयाचे डोंगर पाहायला मिळतात. पालिकेचा स्वच्छता विभाग मात्र, डुलक्या घेत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांकडून पुतळा परिसरातच केली जाते लघुशंका
पुतळा परिसरातच भाजी, फळ विक्रेत्यांकडून हातगाड्या उभ्या केल्या जातात. सडकी भाजी, फळे आणि अंड्याची टरफले आणून टाकतात. कागद व प्लास्टिक पिशव्यांची जाळून विल्हेवाट लावली जाते. यामुळे प्रदूषणालाही हातभार लागत आहे. शौचालयासाठी पुतळा परिसराचा वापर केला जातो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य येथे पसरले असून पुतळ्याच्या अस्तित्वावरच ओरखडे ओढले जात आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या फलक परिसरातच अस्वच्छता!
शहरातील विविध भागात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी स्वच्छ सर्वेक्षणाचे फलक लावण्यात आले आहे. कित्येक ठिकाणी या फलकांच्या पायथ्याशी आणि परिसरातच अस्वच्छता पसरलेली असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. त्यामुळे स्वच्छता विभाग करतो तरी काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.