मद्यप्राशन करून ‘ढगा’ येथे जाल तर फौजदारी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:54 PM2019-03-03T14:54:32+5:302019-03-03T15:19:05+5:30
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याच्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी खरांगणा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली आहे.
वर्धा - महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्वी तालुक्यातील ढगा येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. काही जण हा प्रवास पूर्ण करताना मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याने त्याच्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याने अनुचित प्रकार टाळण्यासाठी खरांगणा पोलिसांनी नवी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम पोलिसांकडून राबविताना वाहनचालक मद्यप्राशन करून आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करून ‘ब्रिथ अॅनालायझर’ द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. जो वाहन चालक किंवा व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत आढळून येईल त्याच्याविरुद्ध खरांगणा फौजदारी कारवाई करणार आहे. ही मोहीम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत राबविण्यात येणार असून या मोहिमेमुळे मद्यधुंद वाहनचालकांच्या अडचणीत चांगलीच भर पडणार आहे.
पोलिसांसह 100 गृहरक्षक देणार खडा पहारा
ढगा येथे येणाऱ्यांवर दोन पोलीस अधिकाऱ्यांसह 50 पोलीस कर्मचारी आणि 50 गृहरक्षक दलाच्या जवानांची करडी नजर राहणार आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी करून कुणी मद्यप्राशन तर करून नाही ना याची शहानिशा ब्रिथ अॅनालायझरद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.
वाहतूक केली वळती
ढगा येथे दर्शनासाठी येणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये. शिवाय अनुचित घटना टाळता यावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन वर्धेकडून कारंजाकडे आणि कारंजाकडून वर्धेकडे येणाऱ्या जड वाहनांचा मार्ग महाशिवरात्री निमित्त एक दिवसासाठी बदलविण्यात आला आहे. ऐरवी जड वाहन खरांगणा होत कारंजाच्या दिशेने जातात. शिवाय कारंजाकडून वर्धेकडे येतात. असे असले तरी केवळ रापमच्या बसेसलाच खरांगणा होत जाता येणार आहे. कारंजाकडून वर्धेकडे येणाऱ्या व वर्धेकडून कारंजाकडे जाणाऱ्या इतर जड वाहनांना माळेगाव (ठेका) मार्गे ये-जा करावी लागणार आहे.
जाताना खरांगणाच्या नव्या पुलावरून तर येताना जुन्या पुलावरून करावा लागेल प्रवास
वाहतुकीची कोंडी होऊ नये या हेतूने खरांगणा पोलिसांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर्वी व वर्धेकडून जाताना वाहनचालकांना आपले वाहन खरांगणा येथील नवीन पुलावरून तर परतीचा प्रवास करताना गावातील जुन्या पुलावरून न्यावे लागणार आहे.
मद्यधुंद अवस्थेत आढळून येणाऱ्या व्यक्तीवर खरांगणा पोलिसांकडून म.दा.का.च्या कलम 85 अन्वये तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळून येणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध एम.व्ही. अॅक्टच्या कलम 185 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
- संतोष शेगावकर, ठानेदार, खरांगना.