मद्यप्राशन करून वाहन चालविताय? सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:29 AM2019-02-07T00:29:39+5:302019-02-07T00:31:25+5:30

वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास तीन महिन्यांकरिता परवाना निलंबनासोबतच पोलीस कारवाईअंती थेट तुरुंगात जावे लागणार आहे.

Drinking alcohol by driving? Be careful! | मद्यप्राशन करून वाहन चालविताय? सावधान!

मद्यप्राशन करून वाहन चालविताय? सावधान!

googlenewsNext
ठळक मुद्देपरवाना निलंबनासह खावी लागेल तुरुंगाची हवा

सुहास घनोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे मागील काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले असून चिंतनाचा विषय ठरला आहे. याकरिता पोलिस विभागाकडून न्यायालयाच्या निर्णयानुसार कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास तीन महिन्यांकरिता परवाना निलंबनासोबतच पोलीस कारवाईअंती थेट तुरुंगात जावे लागणार आहे. या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सध्या वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केली जात आहे.
शहरात मागील काही वर्षांपासून नवशिक्या वाहनचालकांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. वेगाने वाहन पिटाळणे, रस्त्यावर स्टंटबाजी करणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, विना परवाना, विना हेल्मेट वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे चालकांच्या आदी बेशिस्त कृतींमुळे वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते. यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत असून यात निष्पापांना जीव गमवावा लागत आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकवार कारवाईचा बडगा उगारून देखील या प्रकारांना आळा बसलेला नाही. शहरातील बॅचलर रोड, प्रमुख मार्ग, नागपूर मार्ग व अन्य वर्दळीच्या मार्गांवर नवशिके आणि तरुणाई वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसते. ठोस कारवाई होत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने आता कंबर कसली आहे.
आता विहित मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, सिग्नल तोडून जाणे, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, मद्य, शिवाय अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे या बेशिस्त कृती वाहनचालकांना भोवणार आहेत. असे आढळून आल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मोटार वाहन अधिनियम १९८८ कलम १९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ नुसार वाहनचालकांचा परवाना किमान तीन महिन्यांकरिता निलंबित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या कारवाईला प्रारंभ झालेला आहे.
मद्य प्राशन करून, अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविताना आढळल्यास परवाना निलंबनाच्या कारवाईव्यतिरिक्त खटला दाखल करण्यात येणार असून मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम १८५ नुसार पोलिसांनी न्यायालयाकडे मागणी केल्यास वाहनधारकाला तुरूंगातही जावे लागणार आहे.

परवाने निलंबनाकरिता २५० प्रस्ताव
अतिवेगाने, शिवाय वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे व अन्य प्रकारे कारवाईच्या अनुषंगाने परवाने निलंबनाचे २५० प्रस्ताव पोलिस विभागाकडे आले असून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने लवकरच निलंबित करण्यात येणार आहेत.

आता महामार्गांवर हेल्मेटसक्ती
अपघातांचे प्रमाण टाळण्याकरिता गतवर्षी शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. याला विविध स्तरातून विरोध झाला, तरीदेखील कारवाई सुरूच होती. यामुळे अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी झाले होते. मध्यंतरीच्या काळात वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षकांचे सावंगी ठाण्यात स्थानांतरण झाल्यानंतर ही कारवाई गुंडाळली गेल्याने हेल्मेटचा विषय मागे पडता होता. हेल्मेटसक्तीत आता वाहतूक पोलिसांनी शिथिलता आणली असून आता लवकरच महामार्गांवर हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे.

रस्ते अपघातात पाच वर्षांत ९८८ जणांचा मृत्यू
२०१३ मध्ये अपघाताच्या ६८८ घटना घडल्यात. यात १५८ जणांचा मृत्यू झाला. १६२ जणांना गंभीर, तर तर ३१८ जणांना किरकोळ दुखापत झाली. २०१४ मध्ये ५६३ अपघात झालेत. यात १६६ जणांना जीव गमवावा लागला. ११३ जणांना गंभीर तर २३२ जणांना किरकोळ इजा झाली. २०१५ मध्ये ५४५ अपघात १७२ जणांचा मृत्यू, १०२ जणांना गंभीर तर २२५ जणांना किरकोळ इजा झाली. २०१६, १७९ जणांचा मृत्यू, १२० जणांना गंभीर तर २४६ जणांना किरकोळ दुखापत, २०१७ मध्ये १६७ जणांचा मृत्यू, १०४ जणांना गंभीर तर १९६ जणांना किरकोळ, २०१८ या वर्षात १४६ जणांना जीव गमवावा लागला. ८९ जणांना गंभीर तर १३० जणांना किरकोळ दुखापत झाली.

Web Title: Drinking alcohol by driving? Be careful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.