मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात दारूचा पूर
By admin | Published: June 10, 2017 01:27 AM2017-06-10T01:27:09+5:302017-06-10T01:27:09+5:30
गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. परंतु, ग्रामस्थांना मुलभूत सोईसुविधांसाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : गाव मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले आहे. परंतु, ग्रामस्थांना मुलभूत सोईसुविधांसाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. ग्रा.पं.च्या बेताल कारभारामुळे गाव समस्यांचे गोदाम बनले आहे. या गावात पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहे. गावात पाण्याकरिता भटकंती होत असून दारू मात्र मुबलक प्रमाणात मिळत आहे.
येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये पाण्याची समस्या बिकट निर्माण झाली आहे. घरगुती नळाला पाणीच येत नसल्याने ग्रामस्थांना शेतातून बैलबंडी व ट्रॅक्टरने पाणी आणावे लागत आहे. तर ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत अशांना रात्रीचा दिवस करून कुपनलिकेवरून पाणी भरावे लागते. सद्या जमिनीतील पाणीपातळी खोल गेली असल्याने रात्र जागुन ग्रामस्थांना पाण्याची तजविज करावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला व सरपंचाकडे अनेकदा पाणी टंचाईची समस्या सोडविण्याची विनंती केली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडून कागदोपत्री सगळे ‘आल इज बेल’ असल्याचे सांगितल्या जाते; पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर गावाचे वास्तव त्यांना कळू शकेल. आतापर्यंत तीन ग्रामविकास अधिकारी बदलले. मात्र, कायमस्वरूपी अधिकारी देण्यात आला नाही. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.