नादुरुस्त वाहनाला कंटेनरची जबर धडक; चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 16:14 IST2022-02-08T15:52:52+5:302022-02-08T16:14:21+5:30
नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनाला मागाहून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जबर धडक दिली. या भीषण घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.

नादुरुस्त वाहनाला कंटेनरची जबर धडक; चालक ठार
वर्धा : टायर फुटल्याने नादुरुस्त झालेला कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. याच नादुरुस्त वाहनाला मागाहून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जबर धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री महाविद्यालयासमोर मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला.
डब्ल्यू. बी. ११ डी. ८६७२ क्रमांकाच्या कंटेनरचा मागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यानंतर वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहने मध्यरात्री नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला उभे केले. दरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास भरधाव असलेल्या कंटेनरने (एम. एच. ०४ के. एफ. ०५३९) नादुरुस्त वाहनाला जबर धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की एम. एच. ०४ के. एफ. ०५३९ क्रमांकाच्या कंटेनरचा चालक सुभाष वर्मा (रा. जानपूर, उत्तर प्रदेश) ह. मु. बुटीबोरी, जि. नागपूर याचा वाहनाच्या कॅबीनमध्ये दबून जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या वाहनातील चालक बिजेश यादव यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी धनाजी जळक, रामदास बिसने, विजय पंचटिके, संजय चाटे, प्रवीण बोबडे, अमोल वानखेडे, प्रशांत वंजारी, श्रावण पवार, स्वप्निल वंजारी यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
वाहनाचा झाला चुराडा
हा अपघात इतका भीषण होता की, नादुस्त वाहनाला धडक देणाऱ्या वाहनाच्या कॅबीनचा पूर्णपणे चुराडाच झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.