अधिकाऱ्यांच्या कोडगेपणानंतर चालकाची सतर्कताच आली कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 10:06 PM2019-06-08T22:06:52+5:302019-06-08T22:07:21+5:30
राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या खाली उतरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : राज्य परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त असल्याची माहिती चालकाने वरिष्ठांना दिल्यानंतरही तिच बस घेऊन जाण्याच्या सूचना चालकाला करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशी घेऊन नागरपूरकडे निघालेल्या बसचे सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ अचानक स्टेअरींग फ्री झाल्याने भरधाव बस अचानक रस्त्याच्या खाली उतरली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला. ही घटना शनिवारला दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली असून महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वर्धा आगाराची हिंगणघाटमार्गे नागपूरकडे जाणारी एमएच ४० वाय ५४३८ क्रमांकाची बस नादुरुस्त असल्याने ती चालविणे शक्य नाही, असे चालकाने आगारातील वरिष्ठांना सांगितले. तरिही वरिष्ठांनी दुर्लक्ष करुन तिच बस नागपूरकडे नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे चालक प्रवीण लक्ष्मण काळसर्पे व वाहक अर्चना देवगीरकर ५५ प्रवाशी घेऊन नागपूरकडे निघाले. सेलूच्या विद्याभारती महाविद्यालयाजवळ या बसचे स्टेअरिंग अचानक फ्री झाल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चालक काळसर्पे यांनी बसवरील नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अपघात टळला. सर्व प्रवाशांना बाहेर काढून चालकाने आगारातील वरिष्ठांची संपर्क साधत पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली. परंतु कोडग्या अधिकाºयांनी तब्बल दोन तासानंतर बस पाठविल्याने प्रवाशांना उन्हात ताटकाळत उभे राहावे लागले. यात लहान बालकांसह वृद्ध व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाºयांची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याची मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे.