वाहकाच्या अरेरावीचा फटका
By admin | Published: June 7, 2015 02:27 AM2015-06-07T02:27:58+5:302015-06-07T02:27:58+5:30
नादुरूस्त झालेल्या एसटी गाडीतील प्रवाश्यांना दुसऱ्या गाडीत बसवून दिल्यानंतर त्या प्रवाश्यांना त्यांच्या थांब्यावर उतरवून देण्यास नकार देत
वरूड-वर्धा एसटीतील प्रकार : प्रवाश्यांना नाहक भुर्दंड
वर्धा : नादुरूस्त झालेल्या एसटी गाडीतील प्रवाश्यांना दुसऱ्या गाडीत बसवून दिल्यानंतर त्या प्रवाश्यांना त्यांच्या थांब्यावर उतरवून देण्यास नकार देत प्रवाश्यांना मनस्ताप देण्याचा प्रकार वरूड-वर्धा गाडीच्या वाहकाने केला. याबाबत विभागीय नियंत्रकांनी दखल घेऊन संबंधितांना प्रवाश्यांसोबत सौजन्याचा व्यवहार करण्याची सूचना द्यावी, अशी मागणी प्रवाश्यांनी केली आहे.
तळेगाव आगाराची मोर्शी ते वर्धा फेरी आष्टी येथून सकाळी ८.३० वाजता निघाली. या बसची वाहक महिला होती. याच एसटीने अभियंता रितेश राजुरकर प्रवास करीत होते. त्यांनी मोर्शी-वर्धा फेरीच्या वाहकाकडून तळेगाव (रघुजी) करिता प्रवास तिकीट घेतली होती. ही गाडी तळेगावलाच नादुरूस्त झाल्याने गाडीतील प्रवाशांना आर्वी आगाराच्या वरूड-वर्धा (गाडी क्रमांक एमएच ४०-एन ८७७६) गाडीत पुढील प्रवासाकरिता बसवून देण्यात आले. पण गाडी आर्वी येथे येताच वरूड मोर्शी गाडीचा वाहकाने अभियंता रितेश राजुरकर यांना तळेगाव (रघुजी) येथे उतरवून देणार नाही, असे सांगितले. यावर रितेश राजुरकर यांनी आर्वीच्या बसस्थानक नियंत्रककाकडे तक्रारी केली. त्यानी रितेश राजुरकर यांना तळेगाव (रघुजी) येथे उतरवून देण्यास सांगितल्यावर वाहकाने होकारात्मक मान हलविली. पण गाडी पिंपळखुटा येथे आली असता वाहक मोहेकर यांनी प्रवासी रितेश राजुरकर यांच्याशी वाद सुरू केला व तळेगाव रघुजी येथे उतरवून देण्यास नकार देत त्यासंना पिंपळखुटा येथेच उतरण्याचे फर्मान सोडले.
रितेश राजुरकर यांनी केलेली विनंती धुडकावीत तळेगाव (रघुजी) ची तिकीट असताना त्यांना पिंपळखुटा येथे उतरण्यास भाग पाडले धास्तावेल्या रितेशला पिंपळखुटा येथे उतरावे लागल्यानंतर दुसऱ्या गाडीने पुन्हा पैसे मोजत तळेगाव (रघुजी) येथे जावे लागले.
एवढ्यावरच या गाडीच्या वाहकाचा प्रताप थांबला नाही तर मोर्शी-वर्धा गाडीची तिकीट घेऊन बसलेल्या तीन मुलींनाही त्याने त्रास दिला, अशी माहिती रितेश राजुरकर यांनी दिली. परतीच्या प्रवासात रितेश राजुरकर यांनी या वाहकाबाबत आर्वीच्या आगार व्यवस्थापकाकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता आगार व्यवस्थापकाने तक्रार घेण्यास नकार देत पुन्हा अभियंता रितेश राजुरकर यांना मानसिक त्रास दिला. यामुळे एसटी प्रवाश्यांच्या सोयीसाठी आहे वा नाही, प्रश्न उपस्थित होत आहे. गंभीर असलेल्या या प्रकरणात विभागीय नियंत्रक काही कारवाई करतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(प्रतिनिधी)