बॅक वॉटरच्या नुकसानीचे ड्रोनने सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:14+5:30
या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे. आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प पहिल्यांदाच शतप्रशित भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात परिसरातील संपादीत केलेल्या क्षेत्रासह इतरही भागात शिरल्याने शेती व घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता पुनर्वसन विभागाने चार पथक तयार करुन ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु केले आहे.
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पात १९८२ मध्ये २२ गावातील घरे व शेतजमिनी संपादीत करण्यात आल्या. या प्रकल्प यावर्षीच्या दमदार पावसाने पहिल्यांदा शंभर टक्के भरला. त्यामुळे प्रकल्पाच्या बॅक वॉटरने परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात कापूस सोयाबीनसह हळद, अद्रक आदी पिकांचाही समावेश आहे.
बॅक वॉटरच्या पाण्यामुळे संपादीत क्षेत्रासह इतर भागातील घरे व शेतजमिनीचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशाने पुनर्वसन विभागाच्यावतीने तीन दिवसांपासून नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण सुरु केले आहे.
प्रकल्पाच्या बॅक वॉटरचे पाणी कुठपर्यंत पसरले तसेच या पाण्यामुळे शेतीचे किती नुकसान झाले याबाबत योग्य माहिती गोळा करण्याकरिता ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण सुरु आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची योग्य माहिती मिळण्यासाठी मदत होेणार आहे.
यासोबतच परिसरातील इतरही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर, त्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन कार्यालयाकडे रितसर तक्रार करावी, त्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन सर्वेक्षण केले जाईल असे आवाहन विभागाने केले आहे. या सर्वेक्षणाकरिता पुनर्वसन विभागाचे उपविभागीय अभियंता वºहाडे, पांढरे व डांगे प्रयत्नशील आहे.
विभागाचा पारदर्शक सर्वेक्षणासाठी प्रयत्न
निम्न वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी तसेच सर्वेक्षणात पारदर्शकता आणण्यासाठी ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने मदत घेणे सुरू आहे. सर्वेक्षणानंतर जर शेतकरी आरोप-प्रत्यारोप करत असतील तर त्यांना ड्रोन कॅमेºयाच्या सहाय्याने सर्वेक्षण केल्याची सीडी दाखविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात लोअर वर्धा प्रकल्प १०० टक्के भरल्यास पाणी कुठपर्यंत पसरणार तसेच किती शेतकऱ्यांचे नुकसान होईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जमीन संपादीत आहे किंवा नाही, बॅक वॉटरमुळे किती नुकसान झाले, याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शेतकºयावर अन्याय होणार नाही.