दुष्काळसदृश स्थिती; तीन तालुक्यावरून दोनवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:58 PM2018-10-30T23:58:23+5:302018-10-30T23:58:53+5:30
पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरलेले आहेत. त्यामुळेच शासनाने २३ आॅक्टोंबरच्या आदेशान्वये राज्यातील १८० तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचना केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने राज्यभरात दुष्काळाचे सावट पसरलेले आहेत. त्यामुळेच शासनाने २३ आॅक्टोंबरच्या आदेशान्वये राज्यातील १८० तालुक्यामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करुन या तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील कारंजा, आष्टी व समुद्रपूर तालुक्याचा समावेश होता. परंतू प्रशासनाकडून करण्यात आलेल्या रॅण्डम पीक पाहणीत समुद्रपूर तालुक्यातील परिस्थिती चांगली असल्याचा अंदाज वर्तविल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय उपाययोजना व सवलीतीपासून मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन शासनाने दुष्काळसदृष्य १८० तालुक्यांची पहिली यादी जाहीर केली. जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती काही ठिकाणी बरी दिसत असली तरी सोयाबीनची उतारी घटली आहे. काही ठिकाणी कापसाची उलंगवाडी सुरु झाल्याने जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.
परंतू शासनाच्या निकषानुसार पहिल्या यादीत देवळी, समुद्रपूर, आष्टी व कारंजा या चार तालुक्यांचा प्रशासनाने समावेश केला होता. कालांतराने देवळी तालुक्यातील पिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने देवळी तालुका वगळल्याने आष्टी, कांरजा आणि समुद्रपूर या तीन तालुक्यांचा दुष्काळसदृष्य यादीत समावेश झाला. या तिन्ही तालुक्यांना विविध योजना व सवलती लागू करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्यात.
त्यानंतर शासनाच्यावतीने यादीत समावेशित असलेल्या तालुक्यांतील गावांमध्ये रॅण्डम पद्धतीने पीक पाहणी करुन ती माहिती महामदत अॅपवर भरायची होती. त्यानुसार तहसिलदार व कृषी विभागाने पीक पाहणी केली असता समुद्रपूर तालुक्यात पीक परिस्थिती चांगली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा तालुका दुष्काळसदृष्य तालुक्यांच्या यादीत राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून अद्यापही दुष्काळासंदर्भातील माहिती संकलनासह अन्य प्रक्रिया सुरूच असल्याने या दृष्काळसदृष्य परिस्थितीत कोणत्या तालुक्यांचा समावेश होणार किंवा कोणते तालुके यातून वगळणार, हे सध्यातरी सांगणे कठीण आहे.
अशी राबविली रॅण्डम पद्धत
जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा दुष्काळसदृश्य परिस्थितीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १२१ गावे, आष्टी तालुक्यातील १५४ तर समुद्रपूर तालुक्यातील २२२ गावांचा समावेश आहे. या सर्वच गावांना भेटी देऊन पाहणी करणे शक्य नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून रॅण्डम पध्दतीने पीक पाहणी करण्यात आली. यानुसार एकूण गावाच्या संख्येच्या दहा टक्के गावांत पीक पाहणी करण्यात आली. यामध्ये कारंजा तालुक्यातील १२, आष्टी तालुक्यातील १५ तर समुद्रपूर तालुक्यामधील २२ गावांची पाहणी तहसीलदार व कृषी विभागाने केली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे.
दुष्काळाचे आधार
दुष्काळ जाहीर करताना शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार न करता आर्द्रता, पर्जन्यमान, वनस्पती स्थिती तसेच भूजलपातळी निर्देशांक या सर्व बांबींचा विचार केल्या जातो. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती बिकट असतानाही या निकषामुळे दुष्काळावर पांघरुन टाकण्याचे काम केले जाते.
या सवलती मिळणार
दुष्काळसदृष्य गावांना जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पूनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती दिल्या जाणार आहेत.