वृक्षलागवडीत दुष्काळाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:29 PM2019-07-18T22:29:05+5:302019-07-18T22:29:22+5:30
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. मागील वर्षीपर्यंत जुलैमहिन्यात जोमाने वृक्ष लागवड करून उद्दिष्टपूर्ती केली जायची. परंतु, यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्याने वृक्षलागवडीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. पावसाअभावी खड्डे रोपट्यांच्या प्रतीक्षेत असल्याने अद्याप लक्ष्यांकापासून जिल्हा कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाकडून ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. मागील वर्षीपर्यंत जुलैमहिन्यात जोमाने वृक्ष लागवड करून उद्दिष्टपूर्ती केली जायची. परंतु, यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारल्याने वृक्षलागवडीवरही याचा विपरीत परिणाम झाला आहे. पावसाअभावी खड्डे रोपट्यांच्या प्रतीक्षेत असल्याने अद्याप लक्ष्यांकापासून जिल्हा कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
यावर्षी शासनाकडून वर्धा जिल्ह्याला ८७ लाख ५२ हजार २०० वृक्षलागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्हातील सर्व शासकीय, अशासकीय व निमशासकीय कार्यालयासह शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संघटनांना हे लक्ष्य विभागून देण्यात आले आहे. जिल्ह्यात १ जुलै या पर्यावरण दिनापासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. जिल्ह्याभरात ८७ लाख ५२ हजार २०० वृक्षलागवडीचे लक्ष्य असताना प्रशासनाकडून ८३ लाख ४८ हजार ३३२ वृक्षांचे नियोजन केले. त्यानुसार ६३ लाख ४६ हजार ४३५ खड्डे खोदण्यात आले. मात्र, जून महिन्याच्या अखेरच्या दिवसात काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली.
त्यानंतर चांगलीच दडी मारल्याने वृक्ष लागवड करण्याइतपत जमिनीत ओलावा राहिला नाही. परिणामी, वृक्षलागवडीचा कार्यक्रम थांबवावा लागला. अनेक खड्डे रोपट्यांच्या प्रतीक्षेत बुजले असून त्यावरील खर्चही आता निरर्थक ठरणार आहे.
तसेच ज्या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली, तेथील रोपटी जगविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. वृक्षलागवडीकरिता ज्या संस्थांकडे आणि ग्रामपंचायतींकडे रोपटी सोपविण्यात आली, त्या ठिकाणी रोपट्याचे रोपण करण्यापेक्षा त्यांना जगविण्याचीच धडपड करावी लागत आहे.
आता दमदार पावसाशिवाय वृक्षलागवड कार्यक्रमाला गती मिळणे अशक्यच असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.
रोपटी मोजताहेत अखेरच्या घटका
पाऊस बेपत्ता झाल्याने वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत लावलेली रोपटी अखेरच्या घटका मोजत आहे. अनेक ग्रामपंचायतींनी गावात वृक्षलागवडीकरिता खड्डे केले असून पावसाअभावी त्यात अद्यापही रोपट्याचे रोपण केले नाही. हीच परिस्थिती नगरपालिका क्षेत्रांचीही आहे. काही सामाजिक संस्था आणि शासकीय कार्यालयांनी मोकळ्या जागेवर किंवा संस्थेच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले. मात्र, त्यातील बहुतांश रोपटी पाण्याअभावी करपली आहेत. काही ठिकाणी तर रोपट्याच्या काड्याच शिल्लक राहिलेल्या दिसून येत आहेत. यामुळे या वृक्षलागवडीवर करण्यात आलेला खर्च वाया जाणार आहे.
जिल्ह्यात वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण, सध्या पावसाअभावी वृक्षारोपणाचा कार्यक्रम थांबविण्यात आला आहे. जेथे वृक्षारोपण करण्यात आले, ते रोपटे वाचविण्यावर भर असून दमदार पाऊस झाला की पुन्हा या कार्यक्रमाला गती दिली जाईल.
सुहास बढेकर, सहायक उपवनसंरक्षक, वर्धा