जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 05:00 AM2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:03+5:30
सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही समाधानकारक होती, तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मध्यंतरी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली, तर सध्या जिल्ह्यातील विविध भागांत डवरणीच्या कामाला गती दिली जात आहे. असे असले तरी मागील दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने, तसेच पुढील आठ दिवस पाऊस येण्याची शक्यता नसल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे.
सध्याच्या पीक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सोयाबीन, कपाशी तर तुरीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मागील महिन्यात दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील विविध भागांत थांबून थांबून पावसाच्या सरी झाल्याने पीक परिस्थितीही समाधानकारक होती, तर त्यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने, तसेच सध्या ऊनही तापत असल्याने बारा ते पंधरा दिवसांचे अंकुरलेले पीक माना टाकत आहे.
ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी रात्रीही शेतात जाऊन उभ्या पिकाला सिंचन करून पीक वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत आहेत, तर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत. रुसलेला वरुणराजा प्रसन्न होत दमदार बरसावा यासाठी ग्रामीण भागात शेतकरी व ग्रामस्थ सध्या धोंडी काढून देवाला साकडे घालत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
जिल्ह्यात १.१३ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी तब्बल १ लाख १३ हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यापैकी बहुतांश शेतजमिनी कोरडवाहू आहेत. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास १ लाख १३ हजार हेक्टरपैकी अर्धेअधिक सोयाबीन पीक पाण्याअभावी करपण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.
काय म्हणतात शेतकरी...
मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती बिकट झाली आहे. दोन ते तीन दिवस पावसाची प्रतीक्षा केली; पण पाऊस न झाल्याने आता स्प्रिंकलरच्या साहाय्याने सिंचन करून उभे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. असे असले तरी आठवड्यातून काहीच दिवस दिवसाला महावितरण कृषीपंपाला विद्युत पुरवठा करते.
- अंगद गिरधर, शेतकरी, जाम.
माझ्याकडे अकरा एकर शेती आहे. त्यापैकी अडीच एकरात सोयाबीन, सात एकरात कपाशी, तर साडेतीन एकरात तुरीची लागवड केली आहे; पण मागील दहा ते बारा दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने अडचणीत भर पडली आहे. शेतातील विहिरीत असलेल्या पाण्याच्या जोरावर सध्या उभे पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.
- अतुल देशमुख, शेतकरी, चिकणी.
माझ्याकडे कोरडवाहू शेती असून, यंदा सोयाबीनची पेरणी केली आहे. पंधरा ते वीस दिवसांचे अंकुरलेले पीक सध्या पाण्याअभावी माना टाकत आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल.
- एन. बी. कुसरे, शेतकरी, आर्वी.
माझ्याकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यापैकी चार एकरांत कपाशी, तर एका एकरात तुरीची लागवड केली आहे; पण मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंकुरलेल्या पिकांची परिस्थिती बिकट आहे. आज ना उद्या दमदार पाऊस येईल अशी आशा असून सध्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत.
- गजानन डफरे, शेतकरी, चिकणी.