दुबार पेरणीचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:34 PM2018-06-16T23:34:21+5:302018-06-16T23:34:21+5:30

Drought sowing crisis is dark | दुबार पेरणीचे संकट गडद

दुबार पेरणीचे संकट गडद

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ६० टक्के पेरण्या आटोपल्या : दुबार पेरणीकरिता मोफत बी-बियाण्यांची मागणी

पाऊस धारा कोसळताच शेतकऱ्यांकडून पेरण्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पेरण्या साधल्या असे वाटत असतानाच गत तीन-चार दिवसांपासून पावसाने पुन्हा दांडी मारली. पेरलेले बियाणे अंकुरले आहेत. जिल्ह्यातील बऱ्याच भागात पेरण्या आटोपल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ६० टक्के पेरण्या आटोपल्या असून उगविलेले अंकूर तापत असलेल्या उन्हामुळे करपणे सुरू झाले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे त्यांच्याकडून स्प्रिंकलनच्या सहायाने उगविलेले पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पीक वाचणे शक्य नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाशिवाय पर्याय नाही. यात आता दोन दिवसात पाऊस आला नाही तर पेरणीची मोड येण्याची भीती निर्माण झाली आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. गत हंगामात आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यातच आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याचे चित्र निर्माण आहे. आलेले संकट कसे पेलावे या आशेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी दिसत आहे. यामुळे दुबार पेरणीची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून बियाणे आणि खते पुरविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : मान्सून वेळेवर आणि भरपूर प्रमाणात येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात सलग तीन दिवस आलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी बीयांची लागवण केली. तीन दिवसानंतर हवामान खात्याला उपरती झाली हा मान्सूनपूर्व पाऊस असून मान्सूनचा पाऊस यायला अडचणी निर्माण झाल्याने तो नंतर येणार असल्याचे सांगितले. पावसाळ्याच्या नक्षत्रात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र पावसाच्या दडीने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आल्याचे दिसत आहे.
कृषी विभागाच्या सूचनेनुसार ६५ मि.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, आता हा ६५ मि.मी पाऊस एका दिवसात पडणारा की एकूण पडलेला पाऊस हे समजायला मार्ग नाही. जर एका दिवसात ६५ मि.मी. पाऊस झाला तर ती अतिवृष्टी समजली जाते. बोंडअळीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी यंदा मान्सूनपूर्व लागवड केली नाही. डिसेंबरनंतर फरदड घेवू नये, अशा सूचना कृषी विभागामार्फत दिल्या जात आहे. जर जुलैमध्ये दुबार पेरणी करावी लागली तर त्या कपाशीला कधी बोंड येईल व कापूस कधी वेचला जाईल त्यामुळे डिसेंबरचे वेळापत्रक पाळणे अवघडच आहे. डिसेंबर नंतर बोंडअळी आली तर कृषी विभाग पर्यायाने शासन हातवर करणार, हे आताच दिसून येत आहे.
पवनार परिसरात जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. त्यापैकी ६० टक्के शेतकरी हा कोरडवाहू आहे. जर दोन दिवसात पाऊस नाही आला तर त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट गडद झाल्याचे दिसत आहे. ओलीत करून पीक वाचविण्याचा प्रयत्न केल्यास भारनियमनामुळे तेही शक्य होताना दिसत नाही. यामुळे शेतकºयांवरचे संकट प्रत्येक वर्षी नवनव्या वेषात येत असल्याचे बोलले जात आहे.
बोंडअळीचे अनुदान
बोेंडअळीचे अनुदान बुधवारी जमा होईल हे नायब तहसीलदार दीपक राऊत यांनी ठासून सांगितल्यानंतरही ते शुक्रवार पर्यंत जमा झालेले नाही. शुक्रवारी त्यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेवून सांगतो असे मोघम उत्तर दिले, व नंतर मात्र त्यानी चुप्पीच साधल्याचे दिसले.

Web Title: Drought sowing crisis is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती