चांगला रिपोर्ट हवा असेल तर १० हजार रुपये द्या.., लाच स्वीकारताना औषधी निरीक्षकास बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:26 IST2023-11-02T14:19:11+5:302023-11-02T14:26:36+5:30
दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल

चांगला रिपोर्ट हवा असेल तर १० हजार रुपये द्या.., लाच स्वीकारताना औषधी निरीक्षकास बेड्या
वर्धा : औषधी दुकान व एजन्सीचा सकारात्मक अहवाल तयार करायचा असेल तर दहा हजार रुपये द्या, असे म्हणत सात हजार रुपयांची लाच मध्यस्थीमार्फत स्वीकारताना अन्न व औषधी प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सतीश हिरसिंग चव्हाण (वय ४८, रा. वर्धा) आणि प्रवीण यादवराव पाथरकर (४६, रा. केळकरवाडी) यांना नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात अटक केली.
प्राप्त माहितीनुसार, स्नेहलनगर येथील ३७ वर्षीय तक्रारदाराचे औषधी दुकान आणि एजन्सीचा व्यवसाय आहे. लाचखोर औषधी निरीक्षक सतीश चव्हाण हे निरीक्षणासाठी गेले असता निरीक्षणाचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक तयार करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला १० हजारांची लाच मागितली. दरम्यान, प्रवीण पाथरकर याच्यामार्फत ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. प्रवीण पाथरकर याच्यामार्फत सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना औषधी निरीक्षक चव्हाण याला रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलिस निरीक्षक प्रीती शेंडे यांच्या निर्देशात सचिन मते, पोलिस निरीक्षक नीलेश उरकुडे, भरतसिंग ठाकूर, भागवत वानखेडे, दीपाली भगत, सागर देशमुख यंनी केली.