मद्यधुंद क्षेत्रसहायकाची महिला वनरक्षकाला अश्लील शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 05:00 AM2022-05-20T05:00:00+5:302022-05-20T05:00:16+5:30
सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. बोलण्याची पातळी सोडून अर्वाच्य भाषेचा वापर करू लागले. हा सर्व प्रकार महिला वनरक्षकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पिलापूर मौजाचे क्षेत्र सहायक एस.बी. बारसे यांनी मद्यप्राशन करून सुजातपूर मौजाच्या महिला वनरक्षक स्वाती वानखडे यांना मोजमाप पुस्तिकेच्या कारणावरून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हा प्रकार मोबाइलमध्ये कैद करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविल्याने त्यांनाही हादरा बसला. याप्रकरणी महिला वनरक्षकाने वन विभाग व पोलीस ठाण्यात तक्रार दिली; परंतु दीड दिवसाचा कालावधी लोटूनही कारवाई झाली नाही. यावरून वन विभाग मद्यपी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप वनरक्षक महिलेने केला.
बुधवारी वर्धा वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक बी.एन. स्वामी यांचा दौरा होता. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. या कार्यालयाच्या परिसरात पिलापूर वनक्षेत्राचे कार्यालय आहे. दरम्यान, सुजातपूर मौजाच्या वनरक्षक स्वाती पुंडलिक वानखेडे या क्षेत्र सहायक कार्यालयात गेल्या. त्यांनी क्षेत्र सहायक एस.बी. बारशे यांना मोजमाप पुस्तिका मागितली; परंतु बारसे हे मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी महिला वनरक्षकाचे म्हणणे ऐकून न घेता अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली. बोलण्याची पातळी सोडून अर्वाच्य भाषेचा वापर करू लागले. हा सर्व प्रकार महिला वनरक्षकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. याप्रकरणी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी. गायनेर यांना सर्व हकीकत सांगून लेखी तक्रार दिली.
यानंतर सहायक उपवनसंरक्षक स्वामी यांनाही मोबाइलमधील सर्व प्रकार दाखविला. वस्तुस्थितीनुसार कारवाई करण्याची विनंती केली. त्यांनी वर्ध्याच्या उपवनसंरक्षकांना कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना आदेश दिला. मात्र, कालपासून अद्याप यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यानंतर वनसंरक्षक वानखेडे यांनी गुरुवारी आष्टी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली. तरीही ठाणेदारांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. वन विभाग आणि पोलिसांनाकडून या महिला वनरक्षकांना कुठलाही न्याय मिळाला नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत. येत्या आठ दिवसांत न्याय मिळाला नाही, तर न्यायालयात धाव घेऊन वन विभागासमोर उपोषण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे वनविभागात खळबळ उडाली असून आता कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिलापूरचे क्षेत्र सहायक बारसे यांनी महिला वनरक्षक स्वाती वानखेडे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यासंदर्भातील तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारीऱ्यांकडे दाखल केली आहे. त्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करून कारवाईसंदर्भात वर्धा येथील उपवनसंरक्षकांना पत्र पाठविण्याचा आदेश दिला.
-बी.एन. स्वामी, सहायक उपवनसंरक्षक, वर्धा वन विभाग.
सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून, महिला वनरक्षकाकडून मला तक्रार प्राप्त झाली. याप्रकरणी चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव उपवनसंरक्षक वर्धा यांना सादर करणार आहे. या अधिकाऱ्यावर कारवाईचा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.
-आर.बी. गायनेर, प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी, आष्टी (शहीद).