दोन्ही डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले, पण मद्यधुंद अवस्थेत !
By चैतन्य जोशी | Published: March 23, 2024 05:35 PM2024-03-23T17:35:12+5:302024-03-23T17:36:01+5:30
पोलिसांनी दोन्ही मद्यधुंद डॉक्टरांना बेड्या ठोकून कार जप्त केली.
वर्धा : पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने ही बाब भीम आर्मीचे अंकुश कोचे यांनी निदर्शनास आणून दिली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी वर्धा येथून दोन डॉक्टरांना रुग्णालयात जाण्यास सांगितले. मात्र, ते दोन्ही डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात पोहचले. याबाबतची तक्रार अंकुश कोचे यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी दोन्ही मद्यधुंद डॉक्टरांना बेड्या ठोकून कार जप्त केली.
डॉ. प्रवेश प्रतापसिंग धमाने रा. यशवंत कॉलनी वर्धा आणि डॉ. माणिकलाल राऊत रा. जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, अशी अटक केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे आहे. सविस्तर वृत्त असे की, पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या खांद्यावर रुग्णालयाचा डोलारा सुरु आहे. २२ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास काही रुण रुग्णालयात आले. वैद्यकीय अधिकारी नसल्याने तेथील परिचारिकेने मी गोळ्या देऊ शकत नसल्याचे सांगितले. याची माहिती अंकुश कोचे यांना मिळाली असता त्यांनी रुग्णालयात जात ही जिल्हा शल्यचिकित्सकांना फोनद्वारे कळविली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. धमाने आणि डॉ. राऊत यांना वर्ध्याहून ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दोन्ही डॉक्टर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत पोहचले. एका आठ वर्षीय मुलाला ताप आल्याने त्याची प्रकृतीही अत्यवस्थ होती. कोचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मद्यधुंद डॉक्टरांना उपचार करण्यास रोखले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना पोलिस ठाण्यात नेत अटक करुन गुन्हा दाखल केला. मद्यपी डॉ. प्रवेश धमाने याच्याविरोधात यापूर्वी देखील मद्यधुंद अवस्थेत रुग्णांवर उपचार केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशा मद्यपी डॉक्टरांवर कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे.
कारमध्ये मिळाली दारुची बाटली
डॉ. धमाने आणि डॉ. राऊत हे दोघेही मद्यप्राशन करुन होते. ते एमएच. ३२ वाय. ४०४३ क्रमांकाच्या कारने रुग्णालयात पोहचले होते. त्यांच्याकडून साधे बोलणे देखील होत नव्हते. रुग्णांनी डॉक्टरांची अशी अवस्था पाहून अशा डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत कारची पाहणी केली असता कारमध्ये दारुची बाटली आढळून आली. पोलिसांनी दोघांना अटक करुन कारही जप्त केली.
दोन्ही वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद असल्याची तक्रार मिळाली आहे. याप्रकरणाची चौकशी करून कार्यवाही केली जाईल. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात स्थायी आणि अस्थायी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. मात्र, आतापर्यंत ते रुजू का झाले नाही, याबाबत माहिती नाही. दोषी डॉक्टरांवर अवश्य कठोर कारवाई केली जाईल.
डाँ. कांचन वानोरे, आराेग्य संचालक, नागपूर.