दारुबंदी पथकाने केला ‘वॉश आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:43 PM2019-08-14T23:43:44+5:302019-08-14T23:44:53+5:30
सेलू तालुक्यात अवैध दारुविक्री व दारु निर्मितीचे काम चांगलेच वाढले होते. त्यामुळे सेलू पोलीसाच्या दारुबंदी पथकाने बुधवारी सकाळी जामनीच्या पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहीम राबविली. या कारवाईत त्यांनी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू तालुक्यात अवैध दारुविक्री व दारु निर्मितीचे काम चांगलेच वाढले होते. त्यामुळे सेलू पोलीसाच्या दारुबंदी पथकाने बुधवारी सकाळी जामनीच्या पारधी बेड्यावर वॉशआऊट मोहीम राबविली. या कारवाईत त्यांनी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सेलू पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दारुबंदी पथकाने जामनीच्या पारधी बेड्यावर धाड टाकली. यावेळी त्यांना २३ लोखंडी ड्रममध्ये गावठी दारुचा सडवा आढळून आला. तसेच काही ड्रममध्ये जवळपास ९० लीटर गावठी दारु आढळून आली. पोलिसांनी ड्रमसह २ लाख ४३ हजार रुपयाची गावठी दारु व सडवा जप्त केला.
ही कारवाई सेलूचे ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी मोतीलाल धवने, अमोल राऊत, राजेश पचारे, जयेश डांगे यांनी केली. या मोहिमेने परिसरातील दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.