दारूच्या नशेत पत्नीचा खून

By admin | Published: July 1, 2017 12:42 AM2017-07-01T00:42:07+5:302017-07-01T00:42:07+5:30

दारूड्या पतीने पत्नीला बोथट हत्याराने बेदम मारहाण करीत गळा आवळून जीवे मारले.

Drunken wife's blood | दारूच्या नशेत पत्नीचा खून

दारूच्या नशेत पत्नीचा खून

Next

मुलाची तक्रार : शवविच्छेदनावरून खुलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : दारूड्या पतीने पत्नीला बोथट हत्याराने बेदम मारहाण करीत गळा आवळून जीवे मारले. ही घटना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वॉर्डातल्या भाकरा नाला परिसरातल्या बिरसा मुंडा झोपडपट्टीत मंगळवारी घडली. पोलिसांनी पती बंडू नामदेव वानखेडे (५२) याला अटक केली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर बंडू वानखेडे नातेवाईकाकडे निघून गेला होता. पोलिसांनी मृत निलू वानखेडे (४५) हिच्या शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा गुन्हा दाखल करून पती बंडूला नातेवाईकाच्या घरून ताब्यात घेतले.
पोलीस सुत्रानुसार, बंडू वानखेडे याला दारूचे व्यसन होते. तो पत्नी निलू वानखेडे हिच्याशी वारंवार भांडण करून तिला मारहाण करायचा. यातच त्याने मंगळवारी निलूसोबत भांडण केले. त्यात त्याने पत्नीला लोखंडी जडवस्तूने मारले. शिवाय तिचा गळा आवळला. यावेळी झालेल्या झटापटीत निलूने स्वत:चा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात बंडूचे केस पकडल्याचे समोर आले. त्याचे केस निलूच्या हातात मिळाले.
खून केल्यानंतर निलू वानखेडेचा मृतदेह घरातील पलंगावर तसाच पडून होता. मुलगा दिगंबर वानखेडे मामाच्या गावाला गेला होता. तो सायंकाळी घरी आला. त्यावेळी त्याची आई पलंगावर पडून दिसली. त्याने आईला आवाज दिला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आईच्या अंगाला हात लावून पाहिला तेव्हा त्याला आईचे शरीर कडक झाल्याचे दिसले. त्यामुळे थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्रा गिरी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन निलूला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात निलू वानखेडेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. मृत निलू वानखेडे हिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. तिच्या डोळयातूनही रक्तस्राव झाल्याचे दिसत होते. कपाळावर तसेच भुवईच्यावर जखमा होत्या. पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या नागरिकांकडून माहिती घेतली असता बंडू वानखेडे व त्याच्या पत्नीत वारंवार भांडण व्हायचे. तो पत्नीला नेहमी मारहाण करायचा, अशी माहिती समोर आली. या बयाणावरुन व शवविच्छेदन अहवालावरुन निलू वानखेडे हिचा खून झाल्याचे निश्चित करुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Drunken wife's blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.