३५ वर्षांनंतर विरुळात कोरडा दुष्काळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:29 PM2019-06-04T22:29:24+5:302019-06-04T22:29:45+5:30
कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावातील सर्वच विहिरी व अनेक घरगुती बोअर, हातपंप आटले. त्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. दोन हातपंपावर ग्रामस्थांची भिस्त आहे. रखरखत्या उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे अनेकांच्या घरी उन्हामुळे आजारी रुग्ण दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : कधी नव्हे एवढा पाण्याचा दुष्काळ यावर्षी नागरिकांना सहन करावा लागत आहे. गावातील सर्वच विहिरी व अनेक घरगुती बोअर, हातपंप आटले. त्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. दोन हातपंपावर ग्रामस्थांची भिस्त आहे. रखरखत्या उन्हात दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे
अनेकांच्या घरी उन्हामुळे आजारी रुग्ण दिसून येत आहेत. ३५ वर्षांपूर्वी गावात असाच दुष्काळ पडल्याचे जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येते. हीच परिस्थिती यावर्षी निर्माण झाली आहे. गावाची लोकसंख्या साडेपाच ते सहा हजारांच्या जवळपास आहे. चार वॉर्ड असून या चारही वॉर्डातील घरगुती विहिरी, विंधन विहिरी एवढेच नव्हे तर कूपनलिकांनाही कोरड पडली आहे. कुठेच पाण्याचा थेंबही नाही. केवळ आकाजी वॉर्डातील भवानीमातेच्या मंदिराजवळील हातपंप सुरू आहेत. याच दोन हातपंपांवरून नागरिक पाणी घेत आहेत. मागील चार दिवसांपासून गावाला नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा करणाºया मशीनमध्ये बिघाड आल्याने पाणीपुरवठा बंद आहे.
नागरिकांना आठ दिवसानंतर एकदाच पाणी मिळते. नवनियुक्त सरपंच दुर्गाप्रसाद मेहरे नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु वीजपुरवठा हा नियमित नसल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. सद्यस्थितीत वर्धा नदीवरून पाणीपुरवठा होतो. येथील विहिरीला मुबलक पाणी आहे.
मात्र विद्युत पुरवठा पूर्णवेळ राहात नसल्याने नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होऊ शकत नाही. विरुळ गावात प्रथमच ३० ते ३५ वर्षांनंतर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. ही सर्व बाब शासकीय अधिकाऱ्यांना माहिती असूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. गावात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
रखरखत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट
३० ते ३५ वर्षांनंतर गावात प्रथमच टंचाई निर्माण झाल्याने कित्येक किलोमीटर अंतर पायपीट करून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. यात महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
भर उन्हात पाणी भरावे लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावात पाण्याचा दुष्काळ असूनही शासकीय यंत्रणा झोपेचे सोंग घेऊन आहे.