येळाकेळीत धामनदीपात्राला कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:02 PM2019-03-25T23:02:37+5:302019-03-25T23:03:07+5:30
शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरासह लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळाकेळीतील धाम नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने जलसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.
अत्यल्प झालेल्या पावसामुळे यावेळी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये अल्पसा जलसाठा शिल्लक आहे. पाणीटंचाईसदृश परिस्थिती असतानाच तापमानही ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे.
सद्यस्थितीत शहरात आठ दिवसांआड तर ग्रामीण भागातही आठ ते दहा दिवसांआड नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कमी पावसामुळे यावेळी डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने अनेकांनी बोअरवेल केल्या. अद्यापही शहरासह लगतच्या ग्रामीण दररोज बोअरवेल केल्या जात आहेत. वर्धा शहर आणि ग्रामीण भागाला येळाकेळी येथील नदीवरून पाणीपुरवठा होतो.
या पात्रातही सद्यस्थितीत ठणठणाट आहे. आठ-आठ दिवसांआड नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची रखरखत्या उन्हात भटकंती होत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. अनेक ठिकाणी हॅण्डपंप आहेत, मात्र भूजल पातळी खालावल्याने त्यातूनही पाणी येणे बंद झाले आहे. मार्च महिन्यातच ही स्थिती असल्याने एप्रिल, मे महिन्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, हे खरे.
नगरपालिका, जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा अभाव
जल है तो कल है, पाण्याची बचत काळाची गरज, पाच्याचा जपून वापरण्याविषयी नगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना उपदेशाचे डोज पाजले जात आहेत. मात्र, जुने जलस्रोत जिवंत करण्याबाबत प्रशासनाकडून कुठलेही नियोजन करण्यात आले नाही, ही वस्तुस्थिती नाकारयता येणार नाही. कडक उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक आहेत. मार्चच्या अखेरीसच ही परिस्थिती असल्याने नागरिकांना यावेळी प्रथमच भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
जलाशयांमध्येही अल्प जलसाठा
यंदा जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाले. यामुळे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम जलाशयांमध्येही अल्प जलसाठा शिल्लक आहे. पवनार येथील धामनदीपात्रातील पाणीपुरवठा योजनेचा फुटव्हॉल्व्ह वर्ध्याच्या इतिहासात प्रथम उघडा पडला आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. भूजलपातळी खालावल्याने बोअरवेलदेखील कित्येक फूट खोल केल्यानंतर पाणी लागत आहे. अनेक हातपंप कोरडे झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.