शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:18 PM2019-01-28T21:18:40+5:302019-01-28T21:19:17+5:30

हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत.

Dry rivers in the rivers and canals | शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड

शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड

Next
ठळक मुद्देविहिरींच्या पाणीपातळीत घट : जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.): हिवाळा संपत येऊन उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागली आहे. परंतु, हिवाळा संपण्याच्या महिनाभरापूर्वीपासूनच शेतशिवारातील नदी-नाल्यांना कोरड पडली आहे. ही कोरड चिंतनीय असून जलसंकट गडद होण्याचे संकेत आहेत.
यंदाच्या हंगामात झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतशिवारातील बारमाही वाहणारे नदी-नाले पूर्णत: कोरडे झाले आहेत. हेच नदी-नाले जनावरांना पाणी पिण्याचे एकमेव स्त्रोत आहे. नदी-नाल्यांचा पाण्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहेत.
परिसरात जेव्हापासून अप्पर वर्धा धरणातून कालव्याद्वारे शेती सिंचनाकरिता पाणी सोडण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून परिसरातील संपूर्ण विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली होती. यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे अप्पर वर्धा धरणात पुरेसा जलसाठा होऊ न शकल्याने सिंचनाकरिता पाणी पुरेशा प्रमाणात सोडण्यात आले नाही. शेतकऱ्यांनी कशीबशी खरिपातील पिके घेतली. मात्र, अत्यल्प पावसाळ्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट झाली. रब्बीमध्ये बहुसंख्य शेतकºयांनी पाण्याअभावी पेरणीच केली नाही. परिसरात अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात गहू व चण्याची पेरणी केली जात होती. ज्या शेतकºयांनी गव्हाची पेरणी केली, त्या शेतकºयांची ओलिताकरिता भंबेरी उडत आहे. हवामान खात्याचे चांगल्या पावसाचे केलेले भाकित पूर्णत: खोटे ठरले. परतीचा पाऊसही आला नाही त्यामुळे नदी व नाल्यांना हिवाळ्यातच कोरड पडली आहे. तसेच अत्यल्प पावसामुळे जलाशयाचेही तळ दिसत आहे. त्यामुळे आता कोरड्या दुष्काळाशी सामना करावा लागणार असे चित्र दिसत आहे.
ओलिताची समस्या
परिसरात गहू व कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. परंतु, विहिरीची पाणीपातळी घटल्यामुळे शेतकऱ्यांपुढे ओलिताची समस्या निर्माण झाली आहे. पेरणी केलेले पीक जगणार की नाही, याबाबत शेतकरी साशंक आहे. त्यामुळे कांदा लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट होत आहे.
उन्हाळ्यात जलसंकट होणार गडद
बहुतांश गावाच्या नळयोजना या नदी व नाल्यांच्या तिरावर आहे. नदी व नाल्यांना आताच पडलेली कोरड पाहता उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनावारांचेही पिण्याच्या पाण्यावाचून हाल होणार आहेत.

Web Title: Dry rivers in the rivers and canals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.