ड्रायपोर्टलाच लागले ग्रहण; कुठे पळाला लॉजिस्टिक पार्क? आता म्हणतात उभारू विमानतळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:24 AM2023-06-07T11:24:48+5:302023-06-07T11:25:22+5:30
एक ना धड भाराभर चिंध्या : राज्य, केंद्र सरकारचे सिंदी रेल्वेवासीयांना केवळ आश्वासन
सिंदी (रेल्वे) (वर्धा) : संपूर्ण विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील सिंदी ( रेल्वे) येथील ड्रायपोर्टला आता लॉजिस्टिक पार्कचे नाव देण्यात आले आहे; पण ड्रायपोर्ट झालाच नाही. लाॅजिस्टिक पार्कचेही काम संथगतीने सुरू आहे. याच जागी नागपूर मेट्रोला लागणारे कोच तयार होतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. मात्र, तूर्तास तरी कशाचाही पत्ता नाही. सारे काही कागदावर असताना आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे सिंदी रेल्वे येथे विमानतळ उभारण्याची मागणी केली आहे. एकूणच राज्यकर्त्यांचा वर्धा जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली पोरखेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सेलडोह-सिंदी मार्गावर सिंदी रेल्वे शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर स्वीडनच्या दिन इंडिया कंपनीने डेटीनेटर बनविण्यासाठी अल्प मोबदला देऊन तब्बल ५३५ एकर जमीन घेतली होती; परंतु कंपनी उभी न होऊ शकल्याने मागील ३३ वर्षांपासून पडीक असलेल्या या जागेवर शेतकऱ्यांनी ताबा मिळविला. या जागेवर नवीन उद्योग उभा व्हावा, यासाठी तत्कालीन केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. शिवाय या जागेवर उद्योगाची उभारणी व्हावी, यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी येथे ड्रायपोर्ट मंजूर केला; पण पाच वर्षांच्या कालावधीत या जागेवर फक्त संरक्षक भिंत, रेल्वेचा फलाट बनविण्याव्यतिरिक्त अन्य कुठलेही काम सुरू झाले नाही.
तीन वर्षांपूर्वी या जागेवर ड्रायपोर्टऐवजी लॉजिस्टिक पार्क मंजूर करण्यात आला. परंतु, संरक्षक भिंत, रेल्वे रूळ, रेल्वे फलाट व पूल याव्यतिरिक्त पुढे काम सरकलेच नाही. यापश्चात सिंदी रेल्वे येथे मेट्रोच्या बोग्या बनविण्याचा कारखाना बनविण्याचे सरकारतर्फे ठरले होते; मात्र त्याचेही पुढे काहीच झाले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंदी येथे एअरपोर्ट बनविण्यात यावे, यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे. त्यामुळे एअरपोर्टसुद्धा एक निवडणुकीसाठी दिलेला चॉकलेट तर नाही ना, असा प्रश्न सिंदीवासीय विचारत आहेत.