वणा नदी पात्राला डबक्यांचे स्वरूप
By admin | Published: April 26, 2017 12:25 AM2017-04-26T00:25:58+5:302017-04-26T00:25:58+5:30
उन्हाची तीव्रता वाढली असून जलसाठ्यात घट होत आहे. पाण्याचे भांडार असलेल्या नद्यांचे पात्रही कोरडे पडत आहे.
नदीच्या अस्तित्वाला धोका : सार्वजनिक पुढाकाराची गरज
हिंगणघाट : उन्हाची तीव्रता वाढली असून जलसाठ्यात घट होत आहे. पाण्याचे भांडार असलेल्या नद्यांचे पात्रही कोरडे पडत आहे. हिंगणघाट शहराला वरदान ठरलेल्या वणा नदीच्या पात्राचेही डबक्यांत रूपांतर झाले आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत नदीला पाणी राहणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही नदी वाचविण्यासाठी संघटनांनी पुढाकार घेतला असला तरी प्रशासन मात्र कारवाई करीत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
परिसरातील शेतीचे नंदनवन फुलविणारी बारमाही वाहणारी नदी सध्या कोरडी पडण्याच्या मार्गावर आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच नदीचे डबक्यांमध्ये रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळते. पाण्याचा वाहता प्रवाह थांबला आहे. नदीचे पात्र कोरडे पडत असल्याने पाणीटंचाईचे संकट ओढवणार आहे. या समस्येवर प्रशासन उपाययोजना करेल; पण नदीच्या अस्तित्वाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बारमाही वाहणारी, असा लौकीक असणारी वणा नदी मागील वर्षांपासून डबक्यांमध्ये परिवर्तीत होते. यावर्षी एप्रिल महिन्यातच नदीचा वाहता प्रवाह थांबला आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून गवत आणि झुडपांचा विळखा पडला आहे. अनेक ठिकाणी नदीचे पात्र उथळ झाले असून केवळ झुडपेच दिसून येतात.
शहराला वळसा घालून वाहणारी वणा नदी पूढे ग्रामीण भागात पाणी पुरवून शेतीचे नंदनवन फुलविते. शिवाय शहराला पिण्याचे पाणी पुरविते. ही नदी या भागाची जीवनवाहिनी ठरली असली तरी आज तिलाच वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. वणा नदीचे अस्तित्व नष्ट होऊ पाहत असल्याने प्रत्येक वर्षी पालिका प्रशासनाला पाणी विकत घ्यावे लागत असल्याची स्थिती आहे. यंदाही ही नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वणा नदीवर असलेल्या रेती घाटांचे दरवर्षी लिलाव केले जातात. या माध्यमातून रेतीची मोठ्या प्रमाणात उचल केली जाते. प्रशासनाकडून ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रेतीचा उपसा केला जात असल्याने नदीच्या पात्रात खोलवर खड्डे पडले आहेत. याचाच परिणाम म्हणून नदीचे पात्र गतवर्षीपासून डबक्यांमध्ये परिवर्तीत होत असल्याचे दिसते. वणा नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिलीत; पण अद्याप तरी त्याचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. शहरासह पूढे ग्रामीण भागात वाहणाऱ्या नदी पात्राचेही असेच हाल झाल्याचे पाहावयास मिळते. कुठे डबके आहे तर कुठे केवळ माती, मुरूम आणि झुडपांचेच साम्राज्य नदीच्या पात्रात पाहावयास मिळते.
शासनाकडून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे; पण अद्याप वणा नदीचा या अभियानात समावेश करण्यात आलेला नाही. वणा नदीच्या पात्राचे सध्या खोलीकरण करणे गरजेचे आहे. शिवाय घाटांचे लिलाव काही वर्षे बंद ठेवल्यास रेती तयार होऊन पात्र वाहते राहू शकेल; पण या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत आहे. परिणामी, वणा नदी व शहराचे सौंदर्य लुप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(शहर प्रतिनिधी)