९९ शिबिरांमुळे वेळीच ट्रेस झाले तब्बल ३२४ नवीन कोविड बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 05:00 AM2021-03-07T05:00:00+5:302021-03-06T23:30:18+5:30
लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी मिळत गेलेल्या शिथिलतेमुळे वर्धेकरही निश्चित्न झाले होते. इतकेच नव्हे तर डिसेंबरच्या अखेरपासून बहुतांश नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाले होते. वर्धेकरांच्या याच गाफीलतेचा फायदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरला. फेब्रुवारी महिन्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नवीन रणनीती आखून महसूल, पोलीस, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी नव्या जोमाने कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठीच्या कामाला सुरूवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन नवीन कोविड बाधित ट्रेस करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य विभागाच्यावतीने महसूल, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहकार्याने वर्धा उपविभागात तब्बल ९९ कोविड चाचणी शिबिरे घेण्यात आली. याच शिबिरात तब्बल ३२४ नवीन कोविड बाधित ट्रेस करण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमध्ये वेळोवेळी मिळत गेलेल्या शिथिलतेमुळे वर्धेकरही निश्चित्न झाले होते. इतकेच नव्हे तर डिसेंबरच्या अखेरपासून बहुतांश नागरिकांच्या चेहऱ्यावरील मास्कही बेपत्ता झाले होते. वर्धेकरांच्या याच गाफीलतेचा फायदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरला. फेब्रुवारी महिन्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नवीन रणनीती आखून महसूल, पोलीस, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी नव्या जोमाने कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठीच्या कामाला सुरूवात केली. त्याचाच एक भाग म्हणून २२ फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी कोविड चाचणी शिबिर घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत वर्धा, सेलू व देवळी तालुक्यात तब्बल ९९ ठिकाणी शिबिर घेऊन ८ हजार १५३ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता ३२४ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या नवीन कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. एकूणच आयोजित शिबिरांमुळे नवे कोविड बाधित ट्रेस झाल्याने शिबीर उपयुक्तच ठरत आहे.
वर्धा तालुक्यात झाल्या सर्वाधिक कोविड टेस्ट
वर्धा उपविभागात वर्धा, सेलू व देवळी तालुक्याचा समावेश आहे. या तिन्ही तालुक्यांतील कोविड चाचणी शिबीरांचा विचार केल्यास वर्धा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ४ हजार ५४८ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७५ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.
नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस व्हावा या हेतूने वर्धा उपविभागात ठिकठिकाणी कोविड चाचणी शिबीर घेण्यात आली. आतापर्यंत ९९ शिबीरात ८ हजार १५३ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३२४ व्यक्तींचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला आहे.
- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा.
ठिकठिकाणी घेण्यात आलेली कोविड चाचणी शिबीर ही एकट्या आरोग्य विभागामुळेच यशस्वी झालेली नाही. यात महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पोलीस विभागाचा सिंहाचा वाटा आहेच. कुठल्याही व्यक्तीला कारोनाची लक्षणे असल्यास त्या व्यक्तीने ती न लपविता तसेच कुठलीही भीती मनात न बागळता नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून कोविड चाचणी करून घ्यावी. प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे.
- डॉ. माधुरी बोरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी,वर्धा.