बोर व्याघ्र प्रकल्पामुळे ‘ती’ चार गावे दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:58 PM2017-11-18T22:58:53+5:302017-11-18T22:59:24+5:30
आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : आर्वी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका हे गाव बोर व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. तेथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेती करणेही कठीन झाले आहे. या चार गावांमधील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सदर गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करून गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना सादर केलेल्या निवेदनातून माजी आमदार दादाराव केचे यांनी केली आहे.
माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका या गावांमधील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात रोही, जंगली डुक्कर, वाघ, बिबट, अस्वल आदी प्राणी असून रोही व रानडुक्करांचे कळप शेतातील उभ्या पिकांची नासडी करतात. परिणामी, येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शिवाय वाघ, बिबट व अस्वल आदी वन्यप्राणी शेतकरी व शेतमजुरांवर हल्ला करून त्यांना जखमी करीत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीव मुठीत घेऊन शेतकरी व शेतमजुर शेतातील कामे करीत आहेत. माळेगाव (ठेका), मेटहिरजी, उमरविहिरी व येनिदोडका या गावांमधील शेतकºयांसह ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी सदर गावांचा बोर व्याघ्र प्रकल्पात समावेश करून या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना कुंदन जैस्वाल, अनिल लेंडे, प्रमोद डोळे, साहेबराव नांदुरकर, राजकुमार पेटकुले, सुदाम निकोडे, राधेश्याम जैस्वाल, जयंत चौधरी, अभिजीत जैस्वाल, सचिन इवनाथे, चंदु डोळे, कमलाकर लेंडे, विलास आटे, जगदीश वानखेडे, सुरेश नागोसे, राजु राठी आदींची उपस्थिती होती.