‘कॅशलेस’ एटीएममुळे दीपोत्सवावर संक्रांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 11:22 PM2017-10-16T23:22:49+5:302017-10-16T23:23:28+5:30
शासनाने नोटबंदी करीत डिजीटल व्यवहारांवर भर दिला; पण या नोटबंदीचा सामान्यांवरील परिणाम अद्याप थांबला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाने नोटबंदी करीत डिजीटल व्यवहारांवर भर दिला; पण या नोटबंदीचा सामान्यांवरील परिणाम अद्याप थांबला नाही. आॅनलाईन व्यवहारांच्या नावावर एटीएमचे महत्त्व कमी केले. परिणामी, सामान्यांना बँकेतील पैसा काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सणांच्या काळात हमखास एटीएम केंद्र बंद असतात. सध्या सर्वात मोठा दिवाळी सण दोन दिवसांवर आला असताना जिल्ह्यातील बव्हंशी एटीएम बंद आहे. यामुळे पैशासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांसह खासगी बँकांनी मोठ्या प्रमाणात एटीएम केंद्राची सेवा पुरविलेली आहे. प्रत्येक बँकेचे एका शहरात किमान दोन-तीन एटीएम केंद्र आहेत. यातील काही एटीएम तांत्रिक कारणांमुळे तर काही रक्कमच टाकली जात नसल्याने बंद ठेवले जातात. परिणामी, नागरिकांना आपल्याच पैशासाठी भटकंती करावी लागते. एक-दोन दिवस सुट्या आल्या की एटीएम केंदांवर संक्रांतच येते. सर्वच्या सर्व एटीएम केंद्र कॅशलेस होतात. परिणामी, नागरिकांनाही व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
हिंदू वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी हा दोन दिवसांवर आला आहे. १९ आॅक्टोबर रोजी गरीब, श्रीमंत सर्वच लक्ष्मीपूजन करून माता लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून आराधना करणार आहे. या सणासाठी नवीन कपडे, वस्तू, सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. यातील कपडे व सोने खरेदी करताना नागरिकांना आॅनलाईन व्यवहार करता येतील; पण रस्त्यावर बसणाºया विक्रेत्यांकडून काही वस्तू खरेदी करावयाच्या असल्यास त्यांच्याशी आॅनलाईन व्यवहार कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी नागरिकांना खिशात पैसे असणेच गरजेचे असते; पण शनिवार व रविवारची सुटी आल्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश एटीएम कॅशलेस झाल्याचेच दिसून आले. एका व्यक्तीने सोमवारी शहरातील सुमारे १३ एटीएम केंद्र तपासले. हे सर्वच्या सर्व एटीएम कॅशलेस असल्यामुळे बंद ठेवण्यात आले होते. तत्सम फलकही प्रवेश द्वारावरच टांगण्यात आल्याचे दिसून आले. यात राष्ट्रीयकृत तथा खासगी बँकांच्या एटीएम केंद्रांचाही समावेश असल्याचे पाहावयास मिळाले.
शहरातील बहुतांश एटीएम बंद असल्याने अनेक नागरिकांना पैशासाठी भटकंती करावी लागली. बँकांमध्येही पैसे काढणाºयांची गर्दी झाल्याचे दिसून येत होते. एटीएमबाबत प्रत्येक सणामध्ये हा प्रकार घडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बँक प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. जिल्हा अग्रणी बँक प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने बँक ग्राहकांनी तक्रार कुणाकडे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे आता त्रस्त नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे आपला मोर्चा वळविला. जिल्हाधिकाºयांनी बँकांना निर्देश देत एटीएम केंद्र सुरळीत सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
पूर्वीच्या पद्धतीमधील बदलांमुळे अडचणींत वाढ
पूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सूचनांप्रमाणे एटीएममध्ये कॅश टाकण्याचे कंत्राट दिले जात होते; पण या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सध्या बहुतांश बँकांनी एटीएममध्ये कॅश टाकणे तथा मशीन दुरूस्तीसाठी स्वत:ची वेगळी यंत्रणातच तयार केली आहे. यामुळे कंत्राट पद्धती बंद झाली आहे. आता बँकांद्वारेही ही कामे व्यवस्थित केली जात नसल्याने एटीएमच कॅशलेस होत आहेत.