ढगाळ वातावरणामुळे चण्यावर घाटेअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:05 PM2018-02-07T23:05:09+5:302018-02-07T23:05:23+5:30
यावर्षी हंगामाच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. यातच शेतमालाला मिळणारा अल्प दर आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी हंगामाच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागला. यातच शेतमालाला मिळणारा अल्प दर आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ढगाळ वातावरण चार-पाच दिवस कायम राहिल्यास चणा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यावर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात प्रारंभी अल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली होती. वेळोवेळी सोयाबीन पिकाची निगा राखल्याने पीकही अल्पवधीत बहरले; पण पाहिजे त्या प्रमाणात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनचे उतारे आले नसल्याचे शेतकरी सांगतात. यातच यंदा सोयाबीनला मिळालेला दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अल्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. सोयाबीनने धोका दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगामात गव्हासह चणा पिकाची लागवड केली; पण सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे चणा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरण पुढील चार ते पाच दिवस कायम राहिल्यास चणा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिवाय शेतकऱ्यांनीही सल्ला घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कापूस शेतातच
सध्याच्या ढगाळ वातावरणाचा कपाशी पिकावर कुठलाही परिणाम होणार नाही, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात असले तरी जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतातील कापूस मजुरांअभावी शेतातच असल्याचे दिसून येते. ढगाळ वातावरणादरम्यान गारपीट वा थोडाही पाऊस झाल्यास आधीच बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झालेल्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गव्हावर परिणाम नाही
ढगाळ वातावरणाचा गहू पिकावर विपरित परिणाम होणार नाही, असे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे; पण पुढील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहिल्यास थोड्याफार प्रमाणात गहू पिकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुरू
जिल्ह्यातील बहुतांश तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर पिकाची सवंगणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी तुरीची मळणी केली असली तरी अनेकांच्या शेतात तूर पिकाच्या गंजी असल्याचे दिसून येते. ढगाळ वातावरण असल्याने अचानक पाऊस आल्यास तुरीची गंजी भिजून नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे दिसून आले.
कमी दाबाचा पट्टा
सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा वरच्या भागातून खालच्या भागापर्यंत तयार झाल्याने पुढील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याच्यावतीने वर्तविण्यात आली आहे.
अचानक वातावरणात बदल झाला आहे. सध्याचे ढगाळ वातावरण आणखी चार ते पाच दिवस कायम राहिल्यास चणा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच उपाययोजना कराव्यात. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इसी १० मिली १० लिटर पाण्यात मिळवून फवारावे. अन्य उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.