सक्षम अर्थव्यवस्थेमुळे देशाची समृद्धीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:51 PM2019-07-27T20:51:05+5:302019-07-27T20:51:41+5:30
देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भारतात आगामी ३०-४० वर्षांत खूप परिवर्तन होणार आहे. भविष्य उज्ज्वल आहे. १९९२ पूर्वी आपली अर्थव्यवस्था ३६२ बिलियन डॉलर होती. आज २.८ एवढी ९ पटीने वाढलेली आहे. याचा लाभ या विद्यार्थी पिढीला होणार आहे. आगामी पाच-दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पुढे गेलेली असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाची आर्थिक स्थिती सुधारत आहे. भारतात आगामी ३०-४० वर्षांत खूप परिवर्तन होणार आहे. भविष्य उज्ज्वल आहे. १९९२ पूर्वी आपली अर्थव्यवस्था ३६२ बिलियन डॉलर होती. आज २.८ एवढी ९ पटीने वाढलेली आहे. याचा लाभ या विद्यार्थी पिढीला होणार आहे. आगामी पाच-दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पुढे गेलेली असेल. देशाची वाटचाल निश्चितच समृद्धीकडे असल्याचे मत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केले.
जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूूशन्सद्वारे मातोश्री राणीबाई अग्निहोत्री स्मृतिदिनी संस्थांतर्गत शाळा व महाविद्यालयातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारोह अग्निहोत्री इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, नागठाणा रोड, सिंदी (मेघे), येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री होते.
डॉ. संजीव कुमार म्हणाले, सरकारचे आर्थिक धोरण हे सकारात्मक असून ५ त्रिलियन डॉलर करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने आपला देश विकसित होत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:वर, क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. स्वत:ला अपडेट करीत राहा. तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. आपल्याला येणाऱ्या काळात फार मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शंकरप्रसाद अग्निहोत्री म्हणाले, शिक्षण हे जीवनातील तत्त्व असले पाहिजे. शिक्षणाचे पहिले तत्त्व माहिती. माहितीशात्राच्या आधारे ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाच्या रूपाने आपली विचारधारा समर्थ बनविली पाहिजे. विचार सकारात्मक असले पाहिजे यातूनच समजदारी प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा बाळगली पाहिजे. विद्यार्थीदशेत आपली जिज्ञासा प्रबळ असेल तर ते संशोधन करण्याकडे मार्गक्रम होते. विद्यार्थ्यांनी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली पाहिजे.
देशाला, समाजाला आपणाकडून काय देता येईल याचा विचार करावा. सत्याचे अनुष्ठान करा. आपल्या उद्देशपूर्तीसाठी कार्य करा. जो त्याग करेल, तोच पुजला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. सोबतच एजीआयचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचारण त्रिवेदी, सचिन अग्निहोत्री, शिवकुमारी अग्निहोत्री, श्रीराम शर्मा, रमेश मुर्डीव व डॉ. अशोक बिरबल जैन प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन अग्निहोत्री तर संचालन प्रा. प्रफुल्ल दाते यांनी केले. तर आभार डॉ. अशोक बिरबल जैन यांनी मानले. या कार्यक्रमाला जय महाकाली शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.