बंधाऱ्याच्या निकृष्ठ बांधकामामुळे पाणी गेले वाहून
By admin | Published: July 13, 2017 12:55 AM2017-07-13T00:55:53+5:302017-07-13T00:55:53+5:30
नजीकच्या खानगाव येथे जलयुक्त शिवार योजनेत शेतालगत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यात नाला खोलीकरण करण्यात आले होते.
शेतातील माती गेली खरडून : जलयुक्त शिवार योजनेत केले होते काम
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी (शेकापूर) : नजीकच्या खानगाव येथे जलयुक्त शिवार योजनेत शेतालगत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. यात नाला खोलीकरण करण्यात आले होते. मे महिन्यात बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. मात्र पहिल्याच पावसाळ्यात बंधाऱ्याचा काही भाग वाहुन गेला. यात मोझरी (शे.) येथील विजय येंडे यांच्या शेतातील माती खर्डून गेल्याने त्यांचे नुकसान झाले. सदर बंधारा बांधकामाची चौकशी करण्याची मागणी आहे.
तसेच हा बंधारा फुटल्याने बंधाऱ्यात पाणी थांबत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याचा पाणी साठविण्याचा उद्देशच अयशस्वी झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचा उपयोग काय, असा प्रश्न शिवारातील शेतकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देत त्वरित बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे. सदर बंधाऱ्याची वेळीच डागडुजी केल्यास जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश पूर्ण होईल, अशा प्रतिक्रीया शेतकरी वर्गातूंब उमटत आहे.
शासनाच्यावतीने अनेक उपयुक्त योजना राबविण्यात येतात. योजनांचा उद्देश सर्वांना लाभ मिळावा असा असला तरी त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याचे यावरुन दिसून येते. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परिसरात नाला खोलीकरण करुन त्यावर बंधारे बांधण्यात आले आहे. या माध्यमातून साठविलेल्या पाण्याद्वारे जलस्तर वाढविण्याचा उद्देश चांगला असला तरी बंधारा बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या नियोजनशुन्यतेचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत आहे. कंत्राटदाराद्वारे करण्यात आलेल्या कामाची वेळीच पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकार घडत आहेत.