महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत टाकली जाणार जलवाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:36 PM2019-05-20T21:36:46+5:302019-05-20T21:37:02+5:30
शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. आ. भोयर यांनी याबाबत पालकमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी केली. शहर व लगतच्या १३ गावांमध्ये धाममधून पाणीपुरवठा करण्यात येतो.
शहराला नगर परिषद तर १३ गावांना जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. येळाकेळी येथील पंपिंग स्टेशनवरून हा पाणीपुरवठा करण्यात येतो. महाकाली धरणातून पाणी सोडल्यानंतर ते येळाकेली येथील बंधाऱ्यावर अडविण्यात येते. परंतु, अत्यल्प पाऊस झाल्याने यावर्षी धरणात जलसंचय कमी झाला. परिणामी, पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. धरणाची उंची वाढविल्यास पाणी समस्या निकाली निघेल सोबतच शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी मिळेल. याबाबत पाठपुरावा करूनदेखील कार्यवाही झाली नाही. प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित असल्याने त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. उन्हाळ्यात महाकाळी जलाशयातून वर्धा व लगतच्या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी सोडण्यात येते. अंतर अधिक असल्याने २५ टक्के पाणी केवळ येळाकेलीपर्यंत पोहोचते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो. महाकाळीपासून येळाकेळीपर्यंत पाईपलाईन टाकल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही तसेच वर्ध्यासह लगतच्या गावांना पाणीपुरवठा करणे सोईचे जाईल.