डेंग्युने मृत्यू होऊनही नाल्यांची साफसफाई नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:06 AM2018-12-01T00:06:29+5:302018-12-01T00:07:08+5:30
रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : रमणा गावातील सोळा वर्षीय तृप्ती गजानन नाईक हिचा एक महिन्यापूर्वी डेंग्यूने मृत्यू झाला. गावातील स्वच्छतेकडे लक्ष न देता नाल्या गाळाने तुडुंब भरूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. आरोग्य विभाग डेंग्यूने अजून किती बळी घेण्याची वाट पाहात आहेत, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला आहे.
रमणा येथील वॉर्ड क्र. ३ चे प्रकाश आत्माराम नाईक यांनी वॉर्डातील रहिवासींच्या स्वाक्षरीचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले. मात्र त्याला केराची टोपली दाखविली. वारंवार तगादा लावल्यावर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोक्यावर येवून गेले मात्र जाणुनबूजन तेथील रहिवासीवर राग काढल्या जात आहे. दोन वर्षापासून सांडपाणी नालीत तुडुंब गाळाने भरून गेले. लागूनच नाला आहे हे पाणी नाल्यामध्ये सोडल्यास पुढे वाहत जावू शकते. मात्र ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मर्जीतील लोकांच्या हट्टापुढे नतमस्तक झाले आहे.
आरोग्य विभागाचे अधिकारी पाहणी करून गेले. त्वरीत नालीतील तुंबलेला गाळ काढल्या जावून दुर्गंधीयुक्त पाण्याला मार्ग काढून देण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक कर्तव्यात हयगय करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नाल्या गाळांनी भरल्यामुळे सांडपाणी नालीवरून वाहताना पाहूनही ग्रा.पं. चे पदाधिकारी व ग्रामसेवक त्वरीत साफसफाई करीत नसतील तर डेंग्यूने कुणाचा बळी गेल्यास ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या अस्वच्छतेमुळे गावकरी संतप्त असून रोष व्यक्त करीत आहे.
नालीचे बांधकाम अपूर्ण
वॉर्ड क्र. ३ चे नाली बांधकाम अर्धवट आहे. ते बांधकाम पूर्ण करून तेथील रहिवाशांना न्याय देण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून साचून असलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या वासामुळे घरात बसून जेवण करणे कठीण होत असल्याचे तेथील नागरीक सांगतात.
चार-पाच वर्षांपासून बुजलेला शोषखड्डा उपसण्यात आला नाही. त्यामुळे या नालीचे पाणी जाण्यास मार्ग नव्हता. बाजुला शेतकऱ्याची मोठी नाली (बांधी) आहे. तो त्यात पाणी सोडू देत नाही. उद्याच शोषखड्डा साफ करून ते सांडपाणी त्यात सोडून ही समस्या सोडविण्याचे काम करून देतो.
- व्ही.बी. कानतोडे, ग्रामसेवक, रमणा.