पावसाच्या विलंबामुळे वैरण टंचाईचे सावट
By admin | Published: June 25, 2014 11:57 PM2014-06-25T23:57:07+5:302014-06-25T23:57:07+5:30
पावसाळा लागला पण पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर उगवणारे गवत उगवलेच नसल्याने वैरण टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
घोराड : पावसाळा लागला पण पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेताच्या बांधावर उगवणारे गवत उगवलेच नसल्याने वैरण टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
रोहिणी नक्षत्रात येणारा रिमझिम पाऊस यंदा लांबला. मृग नक्षत्रही कोरडेच गेले. आर्द्रा नक्षत्राचे काही दिवस लोटले असताना चक्क लखलखाट दिसत आहे. उन्हाळयाच्या दिवसात जनावरांना लागणारा चारा शेतकऱ्यांजवळ होता, तो साठा आता संपत आला आहे. पावसाळ्यात जनावरांना हिरवाकंच चारा शेताच्या बांधावरच मिळतो पण या हंगामात पावसाने जवळपास तिनही नक्षत्र कोरडे असल्याची झलक दाखविली आहे.
शेतात उन्हाळ्याच्या दिवसात असणारा कड्याळू पेरणीसाठी शेत सज्ज करताना कापल्या गेला. सोयाबीन पावसात ओलेचिंब झाल्याने सोयाबीनचे कुटार बेकार झाले होते. परिसरात शेंगदान्याचा पेरा कमी असल्याने यापासून मिळणारे कुटार नगण्य आहे. केळीच्या बागा नामशेष झाल्याने केळीची पानेही मिळेनासी झाले आहे. गहू पिकाची मळणी हार्वेस्टर यंत्राणे केली जात असल्याने यापासून मिळणारा गव्हांडा नाहिसा झाला आहे. शेतकऱ्यांजवळ असणाऱ्या जनावरांना पावसाळ्यात शेताच्या बांधावर उगवणाऱ्या गवताचा आधार असतो. आकाशात मेघ नाही. लख्ख तापणारी उन्ह शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे. पावसाच्या विलंबामुळे वैरण टंचाईचे सावट निर्माण झाल्याने जनावरे कशी जगवावी अशी चिंता शेतकरी वर्गाला पडली आहे. एकीकडे स्प्रिंकलरने ओलितासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा आणावा तरी कुठून असा प्रश्न वारंवार सतावत आहे.(वार्ताहर)