नाल्याच्या पुरामुळे पीक गेले वाहून
By admin | Published: July 28, 2016 12:40 AM2016-07-28T00:40:41+5:302016-07-28T00:40:41+5:30
गत तीन दिवसांत दोनदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावानजीकच्या नाल्यांना पूर आला.
शेतकरी हवालदिल : नुकसान भरपाईसाठी तहसीलरादांना साकडे
सेलगाव (लवणे) : गत तीन दिवसांत दोनदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे गावानजीकच्या नाल्यांना पूर आला. या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे पीक खरडून गेले, तर शेकडो हेक्टर शेती जलमय झाली आहे. मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना यात सोसावे लागले आहे.
या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आल्याने नाल्या काठावर शेती असलेले विनोद हनुमंत पाचपोहर यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर व संत्र्याची लहान झाडे खरडून गेली. यात शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सदर शेतकऱ्यांने कारंजा येथील तहसीलदारांना कळविले. पण अद्यापही पाहणी करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पाचपोहर यांच्याकडे २ हेक्टर शेती आहे. संपूर्ण पिकाचे नुकसान झाल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महसूल कार्यालयाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे.(वार्ताहर)