पावसामुळे दुबार पेरणीचे संकट तूर्तास टळणार
By admin | Published: June 29, 2017 12:42 AM2017-06-29T00:42:07+5:302017-06-29T00:42:07+5:30
मृग नक्षत्रातील काही दिवस पावसाचा थेंबही न आल्याने नक्षत्राच्या शेवटच खरीपाच्या झालेल्या पेरण्यांना अखेर
आर्द्रा नक्षत्राची मिळाली साथ : कपाशी डोबणी व सोयाबीन पेरणीच्या कामाला वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : मृग नक्षत्रातील काही दिवस पावसाचा थेंबही न आल्याने नक्षत्राच्या शेवटच खरीपाच्या झालेल्या पेरण्यांना अखेर आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्याने दुबार पेरणीचे संकट दूर होण्यास बळीराजाला मदत मिळाली.
सेलू तालुक्यात अजूनपर्यंत सुद्धा खरीपातील पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्या नाहीत. तालुक्यात मागील खरीप हंगामात २९ हजार ६६५ हेक्टर मध्ये कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा आतापर्यत २२ हजार हेक्टर मध्येच पेरणी झाली आहे. तर ९ हजार हेक्टर मध्ये असणाऱ्या तुरीचा पेरा ४ हजार ५०० हेक्टर मध्येच झाला आहे. मागील हंगामात सोयाबीनचा १० हजार १६५ हेक्टर मध्ये असणारा पेरा आतापावेतो ६५०० हेक्टर मध्येच झाला आहे.
जवळपास कपाशीची लागवड ८० टक्के पूर्ण झाली असून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी थांबविली होती. मृग नक्षत्रात लागवड केलेली कपाशी व सोयाबीनची दुबार पेरणी होईल अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात होती पण आर्द्रा नक्षत्रात सोमवारला दुपारच्या सुमारास आलेल्या दमदार पाऊस व मंगळवारला दिवसभर असलेली पावसाची रिमझीम काही प्रमाणात दुबार पेरणी होण्यापासून थांबविण्यात यश मिळाले असले तरी काही अल्प प्रमाणात दुबार पेरणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचा यंदा शेती खर्च वाढला आहे. महिला मजुरांच्या मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेती बजेट वाढले आहे.
कपाशीच्या लागवडीत ३० टक्के बियाणे बाद
सोमवार, मंगळवारला आलेल्या पावसाच्या सरी पाहता शेतकऱ्यांनी कपाशी लावल्यानंतर न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा लागवड करण्यास सुरुवात केली आहे. याला डोबणं असे म्हटल्या जाते, मात्र मृग नक्षत्रात लागवड केलेल्या कपाशीत ३० टक्क्याहुन अधिक बी खलंगा(बाद) गेल्याचे शेतकरी सांगत आहे.